मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – दादर येथील महानगरपालिकेचे जी-उत्तर विभागाचे कर्मचारी प्रभाकर केशवराव काळे (५४) याला वीस हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. आईच्या निधनानंतर स्वतच्या नावावर झोपडे करण्यासाठी तसेच फोटोपास काढण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आली होती. या कारवाईने जी-उत्तर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत जी. उत्तर विभागात राहतात. त्यांचे राहते झोपडे त्यांच्या आईच्या नावावर होते. मात्र आईच्या निधनानंतर ते झोपडे त्यांच्या नावावर होण्यासाठी त्यांनी जी-उत्तर विभागाात रितसर अर्ज केला होता. या अर्जानंतर त्यांनी संबंधित विभागाचे कर्मचारी प्रभाकर काळे याची भेट घेतली होती. यावेळी त्याने त्यांना झोपड्याचे सर्व कागदपत्रांसह त्यांच्या भावाची ना हरकत प्रमाणपत्र देण्यास सांगून झोपड्याचे मोजमाप करण्यासाठी तो स्वत येणार असल्याचे सांगितले होते. ठरल्याप्रमाणे तो मोजमाप करण्यासाठी आला होता. यावेळी त्याने त्यांच्याकडे त्यांच्या नावाने फोटोपास काढण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही लाच दिल्याशिवाय त्यांच्या नावावर फोटोपास काढून मिळणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्याला वीस हजार रुपये दिले होते.
ही रक्कम दिल्यानंतर त्याने उर्वरित तीस हजार रुपयांसाठी तगादा लावला होता. लाचेची उर्वरित रक्कम देण्याची तयारी दर्शवून त्यांनी प्रभाकर काळे याच्याविरुद्ध ३० सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची १७ ऑक्टोंबरला शहानिशा करण्यात आली होती. त्यात प्रभाकर काळेने त्यांच्याकडे थकीत घरभाडे आणि उर्वरित लाचेची मागणी केली होती. त्यानंतर या अधिकार्यांनी संबंधित कार्यालयाजवळ सापळा लावून प्रभाकर काळे याला लाचेचा दुसरा वीस हजार रुपयांचा हप्ता घेताना रंगेहाथ अटक केली. त्याच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, अनिल तुकाराम घेरडीकर, राजेंद्र गणपत सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पर्यवेक्षक अधिकाी संदीप गायकवाड, महिला पोलीस निरीक्षक सुनिता दिघे व अन्य पोलीस पथकाने ही कारवाई केली.