क्रेडिटवर घेतलेल्या १ कोटी ३० लाखांच्या दागिन्यांचा अपहार
गुजरातच्या ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या एक कोटी तीस लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहारप्रकरणी गुजरातच्या एका ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जयदीप सोनी असे या आरोपी व्यापार्याचे नाव असून तो मूळचा गुजरातच्या पालनपूर, बनासकाटा, बॉम्बे मार्केटचा रहिवाशी आहे. त्याच्या अटकेसाठी लवकरच पोलिसांची एक टिम गुजरातला जाणार आहे. जयदीपने अशाच प्रकारे इतर काही ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
यातील तक्रारदार वागेश ऊर्फ वागाराम आसुराम चौधरी हे बोरिवलीतील दौलतनगर परिसरात राहत असून ते सोन्याचे व्यापारी आहेत. त्यांचा होलसेलमध्ये विविध सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. भुलेश्वरच्या डॉ. आत्माराम मर्चंट रोड, लालमनी इमारतीमध्ये त्यांच्या मालकीचे आरव्ही ज्वेलर्स नावाचे एक सोन्याचे दुकान आहे. ऑगस्ट २०२२ रोजी त्यांची जयदीप सोनीशी ओळख झाली होती. तो ज्वेलर्स व्यापारी असून त्याचे गुजरात येथे सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्याने त्यांच्याकडून क्रेडिटवर काही दागिने घेतले होते. या दागिने पेमेंट वेळेवर करुन त्याने त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर त्यांच्यात नियमित व्यवहार सुरु झाला होता. गुजरातमध्ये त्यांच्या दागिन्यांना प्रचंड मागणी असल्याचे सांगून त्याने त्यांच्याकडून ऑगस्ट २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत टप्याटप्याने १ कोटी ३० लाख रुपयांचे २ किलो १२९ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने दागिने पेमेंट केले नाही.
याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने त्यांच्याकडून काही दिवसांनी मुदत मागून घेतली, मात्र त्या मुदतीत त्याने पेमेंट केले नाही किंवा दागिनेही परत नव्हते. जयदीपकडून टोलवाटोलवी सुरु असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ४०९, ४२० भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जयदीप हा मुंबईतील अन्य काही ज्वेलर्स व्यापार्यांच्या संपर्कात होता, त्यामुळे त्याने त्यांच्याकडूनही क्रेडिटवर दागिने घेऊन फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.