मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – अंधेरीतील एका सेक्स रॅकेटचा डी. एन नगर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी नैना नावाच्या एका महिलेस पोलिसांनी अटक केली असून तिच्या तावडीतून तीन तरुणींची सुटका केली. त्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. तिच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता, पोक्सो, पिटा आणि अल्पवयीन न्याय कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत तिला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सुटका केलेल्या मुलीसह तरुणींची मेडीकलनंतर बालसुधारगृहासह महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
नैना ही कांदिवली परिसरात राहत असून ती काही अल्पवयीन मुलीसह तरुणींच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत असून त्यांना ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी विविध हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये पाठवत असल्याची माहिती महिला पोलीस उपनिरीक्षक वाणी यांना मिळाली होती. ही माहिती वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्यांनी बातमीची शहानिशा करुन संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी नैनाला संपर्क साधून तिच्याकडे काही अल्पवयीन मुलीसह तरुणींची मागणी करुन तिला अंधेरीतील सी. डी बर्फीवाला रोड, शिवप्रसाद नाका, ब्रोझो हॉटेलजवळ बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे सोमवारी दुपारी सव्वाच्या सुमारास नैना ही तीन तरुणींसोबत तिथे आली होती. यावेळी तिथे साध्या वेशात पाळत ठेवलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मच्छिंदर, पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या पथकातील महिला पोलीस उपनिरीक्षक वाणी, पोलीस हवालदार चव्हाण, महिला पोलीस हवालदार गावडे, पोलीस शिपाई लाड, दगडे, लाड आणि महिला पोलीस शिपाई बारिया यांनी नैनाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्या तावडीतून पोलिसांनी दोन तरुणींसह एका अल्पवयीन मुलींची सुटका केली.
त्यांच्या चौकशीतून नैनाकडून सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर तिच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता, पोक्सो, पिटा आणि अल्पवयीन न्याय कायदा कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एक मोबाईल, काही कॅश जप्त केले आहे. अटकेनंतर तिला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. सुटका केलेल्या अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात तर दोन तरुणींना देवनार येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.