दरोड्याच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अठरा वर्षांनी अटक

पार्सलच्या बहाण्याने फ्लॅटमध्ये घुसून रॉबरीसह हल्ला केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – दरोड्याच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस अठरा वर्षांनी दिडोंशी पोलिसांनी अटक केली. रमजान नसरुद्दीन ऊर्फ मुस्ताक शेख असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पार्सलच्या बहाण्याने फ्लॅटमध्ये घुसून रमजानसह त्याच्या सहकार्‍यांनी रॉबरीसह एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप होता. गुन्हा घडल्यानंतर तो पळून गेला होता, अखेर अठरा वर्षांनी त्याला अटक करण्यात यश आल्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन सवणे यांनी यांनी सांगितले.

फर्जना अब्दुल्ला शेख ही ३६ वर्षांची महिला मालाड येथील इराणीवाडी, इमारत क्रमांक ए/दहामध्ये राहत असून सातव्या मजल्यावर तिच्या मालकीचे दोन फ्लॅट आहेत. १७ एप्रिल २००६ रोजी ती तिच्या घरात होती, यावेळी सकाळी साडेअकरा वाजता एक तरुण पार्सल देण्यासाठी तिथे आला होता. पार्सल देण्याचा बहाणा करुन त्याच्यासह त्याच्या इतर सहकार्‍यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश करुन फर्जनाचा पती अब्दुला शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. लाथ्याबुक्यासह सळईने केलेल्या मारहाणीत अब्दुल्ला शेख हे जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर घरातील मुद्देमाल चोरी करुन ते सर्वजण पळून गेले होते. हा प्रकार समजताच दिडोंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी फर्जना शेख हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ३९५ भादवी सहकलम ३७ (१) मपोका सहकलम ४, २७ भारतीय हत्यार कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी गुन्ह्यांतील आरोपींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत रमजान शेख याचे नाव समोर आले होते. मात्र गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. गेल्या अठरा वर्षांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता.

त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय ढोले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख यांना दिले होते. या आदेशानंतर गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन सवणे, पोलीस हवालदार दळवी, गणेश शिंदे, पोलीस शिपाई वैरागर, शैलेंद्र भंडारे यांनी रमजानच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना रमजान हा सांताक्रुज येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर उपनिरीक्षक नितीन सवणे व त्यांच्या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून रमजानला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तोच दरोडयाच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक करुन बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रमजान शेख हा सांताक्रुज येथील गोळीबार रोड, जनसेवा कमिटी, बिस्मिल्ला चाळीचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page