घरफोडीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस २१ वर्षांनी अटक
मुंबईसह चेन्नईला स्वतचे अस्तिस्त बदलून राहत होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – घरफोडीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस २१ वर्षांनी अटक करण्यात पायधुनी पोलिसांना यश आले आहे. मस्तान इब्राहिम शेख असे या आरोपीचे नाव असून जामिनावर बाहेर आल्यानंतर तो चेन्नईला पळून गेला होता. स्वतचे नाव बदलून तो सतत स्वतचे मुंबईसह चेन्नईतील वास्तवाचे ठिकाण बदलत असल्याचे तपासात उघडकीस आले. अखेर त्याला २१ वर्षांनी धारावीतून अटक करण्यात पोलिसांना यश आल्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल वायाळ यांनी सांगतले.
२००२ साली पायधुनी येथील एका खाजगी कार्यालयात घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी कार्यालयातील कॅशसहीत इतर मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यात मस्तान शेख याचा समावेश होता. याच गुन्ह्यांत ते तिघेही न्यायालयीन कोठडीत असताना त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर मस्तानला लोकल कोर्टाने जामिन मंजूर केला होता. जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. माझगाव लोकल कोर्टात त्याच्याविरुद्ध नियमित खटला सुरु होता. मात्र तो प्रत्येक सुनावणीला गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध अजमिनपात्र वॉरंट बजाविण्यात आले होते. तो पळून गेल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला या गुन्ह्यांत वॉण्टेड आरोपी घोषित करण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. मस्तान हा मूळचा चेन्नईचा रहिवाशी होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी एक टिम चेन्नईला गेली होती, मात्र तिथे तो पोलिसांना सापडला होता. तरीही त्याचा पोलिसांनी शोध सुरु ठेवला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना मस्तान हा धारावी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. मोहितकुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्सना रासम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष रासम, उपनिरीक्षक अनिल वायाळ,पोलीस हवालदार इरफान खान, शिरवाडकर, दिपक निकम, शंकर राठोड, मुल्ला, पोलीस शिपाई नितेश घोडे, मोकल यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून मस्तानला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तोच घरफोडीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला या गुन्ह्यांत फेरअटक करुन पुन्हा लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करुन त्याची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल वायाळ यांनी सांगितले.