सेक्सट्रॉर्शनद्वारे ६६ वर्षांच्या वयोवृद्ध व्यावसायिकाची फसवणुक
२९ लाखांच्या खंडणीसह फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सेक्सट्रार्शनद्वारे एका ६६ वर्षांच्या मेडीकल व्यावसायिकाची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक करुन खंडणी वसुली केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तोतया पोलीस अधिकार्याविरुद्ध खंडणी, अपहारासह फसवणुक तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तक्रारदार व्यावसायिकाचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्यासह त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची भीती दाखवून या ठगांनी आतापर्यंत २९ लाख रुपये उकाळल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
६६ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार कफ परेड परिसरात राहत असून त्यांचा मोहम्मद अली रोडवर एक मेडीकल स्टोर आहे. १० जूनला त्यांच्या फेसबुकवर पूजा शर्मा नावाच्या तरुणीची फें्रण्ड रिक्वेस्ट आली होती. ती रिक्वेस्ट कुठलीही शहानिशा न करता त्यांनी स्विकारली होती. त्यानंतर त्यांच्यात चॅटवर संभाषण सुरु झाले होते. दोन दिवसानंतर चॅट केल्यानंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. दोन दिवसांनी तिने त्यांना व्हिडीओ कॉल केला होता. त्यांनी कॉल घेतल्यानंतर समोर एक तरुणी नग्नावस्थेत होती. तिने त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करुन त्यांनाही कपडे काढण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे त्यांनीही स्वतचे कपडे काढले होते. काही वेळानंतर तिने कॉल बंद केला. दोन दिवसांनी पूजाने त्यांना कॉल करुन त्यांच्याकडे ५० हजाराची मागणी केली. पैसे दिले नाहीतर त्यांचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन बदनामीची धमकी दिली होती. या प्रकारामुळे ते प्रचंड घाबरले होते.
ही घटना ताजी असताना २९ जूनला त्यांना प्रमोद राठोड नावाच्या एका व्यक्तीचा कॉल आला. त्याने तो दिल्ली पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून काम करत असून त्यांच्याविरुद्ध पूजा शर्मा या तरुणीने तक्रार केली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार असून याच गुन्ह्यांत त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल अशी त्याने त्यांना भीती दाखविली होती. गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यानंतर दुसर्या दिवशी त्याने त्यांना पुन्हा कॉल करुन पूजा शर्माने त्यांच्याविरुद्ध खोटी तक्रार केली होती. त्यामुळे तिला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. मात्र पोलीस कोठडीत असताना तिने आत्महत्या केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यांत त्यांना मदत करण्यासाठी तसेच पूजाच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करुन प्रकरण मिटविण्यासाठी त्याने त्यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली होती.
समाजात त्यांची प्रचंड प्रतिष्ठा होती. या संपूर्ण प्रकरणामुळे त्यांची बदनामी होण्याची शक्यता होती. त्यामुळे बदनामीच्या भीतीने त्यांनी प्रमोद राठोडने दिलेल्या बँक खात्यात २९ लाख २८ हजार पाठवून दिले होते. ही रक्कम पाठवून तो त्यांच्याकडे सतत पैशांची मागणी करत होता. त्यामुळे त्यांनी हा प्रकार त्यांच्या परिचित वकिलाला सांगितली. यावेळी या वकिलांनी त्यांची अज्ञात सायबर ठगाकडून फसवणुक झाली असून त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी १९३० या सायबर हेल्पलाईनसह दक्षिण प्रादेशिक सायबर सेल विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीसोबत त्यांनी पुजा शर्मासोबत झालेले संभाषण आणि विविध बँकेत पाठविलेल्या पैशांचा तपशील सादर केला होता. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पूजासह तोतया पोलीस अधिकारी प्रमोद राठोड यांच्याविरुद्ध ३०८ (६), ३१८ (४), ३१९ (२), ६१ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ६६ (सी), ६६ (डी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.