मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ मार्च २०२४
मुंबई, – कर्नाटक येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आर. रुद्रेश यांच्या हत्येतील एका वॉण्टेड आरोपीला आठ वर्षांनी अटक करण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) यश आले आहे. मोहम्मद घौस नयाज अहमद नयाझी ऊर्फ घौसभाई असे या आरोपीचे नाव असून तो बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा पदाधिकारी आहे. टांझानिया येथून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच त्याच्यावर या अधिकार्यांनी अटकेची कारवाई केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी कर्नाटक येथे नेण्यात आले आहे. या गुन्ह्यांत यापूर्वी चार आरोपींना एनआयएने अटक केली असून त्यांच्याविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे.
१६ आक्टोंबर २०१६ साली कर्नाटक येथे संघाचे आर रुद्रेश यांची हत्या झाली होती. त्यांच्या हत्येनंतर काही समाजकंटकांना शहरात तणावाचे वातावरण निर्माण करुन जातीय दंगली घडवून आणायच्या होत्या. आरएसएसविरुद्धचा लढा हा पवित्र युद्ध आहे असे मानू असे सांगून हत्येतील मारेकर्यांना भडकाविण्यात आले होते. या हत्येच्या घटनेची राज्य शासनाने गंभीर दखल घेत त्याचा तपास राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे सोपविला होता. हा तपास हाती येताच स्थानिक पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून चार आरोपींना अटक केली होती. त्यांच्या अटकेने या संपूर्ण कटाचा मास्तरमाईंड घौसभाई असल्याचे उघडकीस आले होते. मात्र हत्येनंतर तो भारतातून पळून गेला होता. गेल्या काही वर्षांपासून तो विदेशात वास्तव्यास होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध एनआयएने सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर लुक आऊट नोटीस जारी केले होते. त्याच्या अटकेसाठी पाच लाख रुपयांचे ईनाम घोषित केले होते.
या गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित सर्व आरोपीविरुद्ध विशेष स्थानिक न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. त्यात घौसभाई याचा समावेश होता. त्याला या गुन्ह्यांत वॉण्टेड आरोप दाखविण्यात आले होते. त्याच्या अटकेसाठी एनआयएने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना तो टांझानिया दार-ए-सलाम येथून भारतात येत असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. शुक्रवारी घौसभाई हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच त्याला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तो वॉण्टेड घौसभाई असल्याचे उघडकीस येताच त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी कर्नाटक येथे नेण्यात आले. घौसभाई हा केंद्र सरकारने बंदी घेतलेल पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) पदाधिकारी तसेच एसडीपीआय हेब्बल विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष असल्याचे बोलले जाते.