दारुच्या नशेत इमारतीखाली बसतो म्हणून ४५ वर्षांच्या व्यक्तीची हत्या
दोन आरोपींना अटक तर पळून गेलेल्या सुरक्षारक्षकाचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – दारुच्या नशेत इमारतीखाली बसतो म्हणून एका ४५ वर्षांच्या व्यक्तीची तिघांनी बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना गिरगाव परिसरात उघडकीस आली आहे. जलील जमील खान असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी दोघांना व्ही. पी रोड पोलिसांनी अटक केली आहे. विशाल नितीन शिंदे आणि मयंक योगेश जेठवा अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत संतोष सिंग या सुरक्षारक्षकाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
ही घटना मंगळवारी रात्री सव्वाबारा वाजता गिरगाव येथील खेतवाडी, सातवी गल्लीतील साई सहकारी सोसायटीमध्ये घडली. २२ ऑक्टोंबरला एका जखमी व्यक्तीला जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला होता. ही माहिती नंतर डी. बी मार्ग पोलिसांना देण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता. चौकशीदरम्यान मृत व्यक्तीचे नाव जलील खान असल्याचे उघडकीस आले होते. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट नंतर पोलिसांना प्राप्त झाला. त्यात त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याच्या शरीरावर मारहाण केल्याच्या अनेक जखमा होत्या. त्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या जलीलचा मृत्यू झाला होता. तपासात ही बाब समोर येताच पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान जलील याला दारु पिण्याचे व्यसन होते, तो दाऊ पिऊन नेहमी साई सहकारी सोसायटीजवळ जात होता.
याच कारणावरुन सोसायटीचे स्थानिक रहिवाशी विशाल शिंदे आणि मयंक जेठवा तसेच सुरक्षारक्षक संतोष सिंग या तिघांनी त्याला जाब विचारला होता. त्यातून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि या तिघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केलीद होती. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. तपासात उघडकीस आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी विशाल शिंदे आणि मयंक जेठवा या दोघांनाही हत्येच्या गुन्ह्यांत अटक केली तर हत्येच्या घटनेनंतर सतोष सिंग हा सुरक्षारक्षक पळून गेला आहे. त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. दारुच्या नशेत इमारतीखाली बसतो या क्षुल्लक कारणावरुन एका व्यक्तीची बेदम मारहाण करुन हत्या झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. दुसरीकडे ही हत्या गिरगाव परिसरात घडल्याने त्याचा तपास व्ही. पी रोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.