मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – व्यावसायिक गाळ्यासाठी घेतलेल्या तीस लाखांचा अपहार करुन एका महिलेची तिच्या भावासह वहिनीने फसवणुक केल्याचा प्रकार प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी भावासह त्याची पत्नी आणि मित्राविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सर्वेश सिंग, राधा सर्वेश सिंग आणि श्रीनिवास बासा अशी या तिघांची नावे असून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
ममता कार्तिक सिंग ही ५६ वर्षांची तक्रारदार महिला मालाडच्या जनकल्याणनगर परिसरात राहते. आरोपी सर्वेश हा तिचा भाऊ तर राधा वहिनी आहे. चार वर्षांपूर्वी या दोघांनी तिला गोरेगाव येथील एस. व्ही रोड, सिटी सेंटर मॉलमागील साईबाबा इन्कलेव इमारतीमध्ये एक व्यावसायिक गाळा दाखविला होता. या गाळ्याची विक्री करायची आहे असे सांगून तिला तो गाळा खरेदी करण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे तिने गुंतवणुक म्हणून तो गाळा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. चर्चेअंती त्यांच्यात ४० लाखांमध्ये सौदा पक्का झाला होता. त्यासाठी तिने सर्वेश, राधा आणि मध्यस्थी म्हणून काम करणारा मित्र श्रीनिवास यांना गाळा खरेदीसाठी फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२३ या कालावधीत टप्याटप्याने चाळीस लाख रुपये दिले होते.
काही महिन्यानंतर त्यांच्यात गाळ्याच्या खरेदी-विक्रीवरुन वाद झाला होता. त्यामुळे तिने त्यांच्याशी सुरु असलेला व्यवहार रद्द करुन सर्वेश आणि राधा सिंग यांच्याकडे गाळ्यासाठी दिलेल्या पैशांची मागणी केली होती. यावेळी त्यांनी दहा लाख रुपये परत करुन उर्वरित तीस लाखांचा परस्पर अपहार करुन तिची फसवणुक केली होती. भावासह वहिनीकडून व्यवहारात फसवणुक झाल्याने तिने गोरेगाव पोलिसांत तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सर्वेश सिंग, राधा सिंग आणि श्रीनिवास बासा या तिघांविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत तपास सुरु असून अद्याप कोणावर अटकेची कारवाई झालेली नाही. चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल असे पोलिसांनी सांगितले.