मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – दिवाळीच्या सफाईच्या बहाण्याने घरी आलेल्या तीनपैकी एका व्यक्तीने कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरच हातसफाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीस चोरीच्या मुद्देमालासह एमएचबी पोलिसांनी अटक केली. अरबाज फिरोज खान असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
लिना विक्रांत म्हात्रे ही ५५ वर्षांची महिला दहिसर येथील जे. एस रोड, ऋषिकेश सोसायटीमध्ये राहते. १२ ऑक्टोंबर ते २२ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत तिच्या घरातील बेडरुममधील कपाटातून अज्ञात व्यक्तीने विविध सोन्या-चांदीचे दागिने, दोन महागडी घड्याळ असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. हा प्रकार मंगळवारी उघडकीस येताच तिने एमएचबी पोलिसात तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभोये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव, पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरडे, पोलीस हवालदार प्रविण जोपाळे, संदीप परिट, सतीश देवकर, पोलीस शिपाई अर्जुन आहेर, गणेश शेरमाळे, आदित्य राणे (तांत्रिक मदत) यांनी तपासाला सुरुवात केली होती.
तपासात या महिलेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नो ब्रोकर ऍपवरुन क्लिनिंग सर्व्हिस बुक केली होती. त्यानंतर तिच्या घरी साफसफाईसाठी दोनजण आले होते. या दोघांना सोडण्यासाठी त्यांचा तिसरा एक मित्र आला होता. घरातील साफसफाई केल्यानंतर ते सर्वजण निघून गेले होते. मात्र २१ ऑक्टोंबरला सकाळी पावणेनऊ वाजता त्यापैकी दोनजण पुन्हा सोसायटीमध्ये आले होत. त्यांनी रजिस्टरमध्ये त्यांचे नाव आणि मोबाईल क्रमांक दिले होते. त्यामुळे पोलिसांनी सोसायटीचे सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात संबंधित व्यक्तींची ओळख पटली होती. त्यात अरबाज फिरोज खान, संतोष ओमप्रकाश यादव आणि सुफियान नजीर अहमद सौदर यांचा समावेश होता. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
चौकशीदरम्यान अरबाज खान यानेच तक्रारदार महिलेच्या घुसून ही चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. दिवाळीत प्रत्येकजण आपल्या घराची साफसफाई करतो. त्यामुळे तक्रारदार महिलेने सफाईसाठी या कामगारांना तिच्या घरी बोलाविले होते. त्याचाच अरबाजने फायदा घेतला आणि त्याने ही चोरी करुन पलायन केले होते. खासगी कामगारांकडून सफाई करणे या महिलेला चांगलेच महागात पडले होते.