फसवणुकीच्या पैशांतून दागिने खरेदी करणे महागात पडले

पार्टटाईम जॉबच्या नावाने फसवणुक करणार्‍या ठगाला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ मार्च २०२४
मुंबई, – पार्टटाईम जॉबच्या माध्यमातून आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून एका ५५ वर्षांच्या व्यक्तीला विविध प्रिपेड टास्कसह पैसे परत मिळविण्यासाठी सुमारे साडेसात लाखांना गंडा घालणार्‍या ठगाला अखेर बोरिवली पोलिसांनी अटक केली. मोहम्मद इम्रान जमाल मोहम्मद असे या २८ वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीच्या पैशांतून दोन ज्वेलर्स दुकानातून दागिने खरेदी करणे मोहम्मद इम्रानला चांगलेच महागात पडले. याच दागिन्याच्या खरेदीवरुन त्याच्यापर्यंत पोहचण्यात पोलिसांना मोठी मदत झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.

यातील तक्रारदार बोरिवली येथे राहत असून व्यवसाायने ठेकेदार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना एका अज्ञात वयक्तीने फोन करुन तो जीबीएल डिझिटल मार्केटींग कंपनीचा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगितले. त्यांना पार्ट टाईम जॉबद्वारे आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून त्याने त्यांना वेगवेगळे ऑनलाईन टास्क दिले. त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून त्यांना टास्क पूर्ण केल्यानंतर काही कमिशनची रक्कम पाठवून दिली होती. त्यानंतर त्यांना विविध प्रिपेड टास्क देऊन त्यात काही रक्कम गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी त्यांच्याकडून टॅक्सच्या नावाने काही पैसे घेण्यात आले होते. अशा प्रकारे त्यांनी टास्कसह पैसे काढण्यासाठी सुमारे साडेसात लाख रुपये पाठविले होते. मात्र ही रक्कम पाठवून त्यांना मुद्दलसह कमिशनची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त धरणेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील, प्रमोद निंबाळकर, पोलीस हवालदार शेख, पोलीस शिपाई गरजे, पाटील, नांगरे यांनी तपासाला सुरुवात केली होती. याकामी या पथकाला पोलीस उपनिरीक्षक नेत्रा मुळे यांनी विशेष मदत केली होती. तपासादरम्यान ही रक्कम एका बँक खात्यात जमा झाली होती. त्यानंतर पेटीएम आणि जीपेद्वारे ही रक्कम काढण्यात आली आहे. त्यापैकी ५ लाख ९१ हजार ३०० रुपये मालवणीतील मार्वे परिसरातील मेहता गोल्ड आणि मालाडच्या रिषभ ज्वेलर्समधून सोन्याचे दागिने खरेदी करण्यात आले होते. या दोन्ही ज्वेलर्स मालकांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीतून मोहम्मद इम्रानचे नाव समोर आले होते. हाच धागा पकडून या पथकाने तांत्रिक माहितीवरुन मालाडच्या मालवणी परिसरात राहत मोहम्मद इम्रानला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. फसवणुकीच्या पैशांतून सोन्याचे दागिने घेणे मोहम्मद इम्रानला चांगलेच महागात पडले आहे.
वयोवृद्ध महिलेच्या ऑनलाईन फसवणुकीप्रकरणी दुकलीस अटक
दुसर्‍या घटनेत ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांत दोन आरोपींना बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. सर्वजोत नरेश पासवान आणि विकीकुमार विनोद पासवान अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. रेणू बिमल कूपर ही ७० वर्षांची वयोवृद्ध महिला मालाड येथे राहते. एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये ती हिंदी विषय शिकवते. ८ ऑक्टोंबर २०२३ रोजी ती तिच्या मोबाईलवर अँजिओ कस्टमर केअरचा क्रमांक शोधत होती. यावेळी तिला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो अँजिओ कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून तिला बोलण्यात गुंतविले. तिला दोन ऍप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करुन तिच्या मोबाईल स्क्रिनचा ताबा मिळविला. त्यानंतर तिच्या बँक खात्यातून ऑनलाईन चार लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. बँकेतून पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज प्राप्त होताच तिला फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तिने बांगुरनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिीसांनी सर्वजोत पासवान आणि विकीकुमार पासवान या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत या दोघांच्या बँक खात्यात फसवणुकीची ही रक्कम जमा झाली होती. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीत या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page