बाबा सिद्धीकी हत्येमागे बिष्णोई टोळी असल्याचे उधडकीस
अनमोल बिष्णोईला पाहिजे आरोपी; गुन्ह्यांत मोक्का लावणार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांची हत्या विदेशातून टोळीचे सूत्रे हलविणारा अनमोल बिष्णोाईने दिल्याची धक्कादायक माहिती अटक आरोपींच्या चौकशीतून उघडकीस आली आहे. त्यामुळे या हत्येमागे बिष्णोई टोळी असल्याचा दावाच मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यांत अनमोल बिष्णोई याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यांत लवकरच मोक्का कायद्यांतर्गत कारवाई होणार असून सर्व आरोपींना फेरअटक होणार असल्याचे बोलले जाते. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर आल्याने बिष्णोई टोळीच्या अडचणीत चांगली वाढ झाली आहे.
१२ ऑक्टोंबरला वांद्रे येथे कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघालेल्या बाबा सिद्धीकी यांची तीन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येचा तपास नंतर खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. हा तपास हाती येताच आतापर्यंत पंधरा आरोपींना अटक केली आहे. त्यात गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप, प्रविण रामेश्वर लोणकर, हरिशकुमार बालकराम निशाद, नितीन गौतम सप्रे, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, संभाजी किसन पारधी, राम फुलचंद कनोजिया, भगवतसिंग ओमसिंग, अमीत हिसमसिंग कुमार, रुपेश राजेंद्र मोहोळ, करण राहुल साळवे, शिवम अरविंद कोहाड, सुजीत सुशील सिंग यांचा समावेश आहे. त्यापैकी गुरमेल, प्रविण आणि धर्मराज वगळता इतर सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. या कटात तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यात शिवकुमार गौतम, शिवकुमार गौतम, मोहम्मद जिशान अख्तर आणि शुभम रामेश्वर लोणकर यांचा समावेश आहे. बाबा सिद्धीकी यांची हत्या बिष्णोई बंधूंच्या आदेशावरुन झाल्याचे आतापर्यंत तपासात उघडकीस आले आहे.
अनमोल बिष्णोईने सुजीत सिंग, जिशान अख्तर आणि शुभम लोणकर यांच्यावर बाबा सिद्धीकी यांच्या हत्येची जबाबदारी सोपविली होती. सुजीत हा अनमोलचा नियमित संपर्कात होता. सोशल मिडीयाच्या विविध ऍपच्या माध्यमातून या दोघांचे संभाषण सुरु होते. त्याच्याकडून मिळणार्या सूचना तोच इतरांना देत होता. अनमोलनेच त्याला विदेशातून पैसे पाठविले होते. या पैशांचा वापर शस्त्रे खरेदीसह शूटरच्या राहण्या-खाण्यासाठी देण्यात आले होते. सुजीतच्या अटकेनंतर या गुन्ह्यांत अनमोल बिष्णोईचे नाव समोर आले होते. चौकशीत अनमोलचे नाव आल्यानंतर त्याला या गुन्ह्यांत आता पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. सलमान खान याच्या घरासमोर बिष्णोई टोळीने गोळीबार केला होता. त्यानंतर आता बिष्णोई बंधूनेच बाबा सिद्धीकी यांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. अनमोल बिष्णोई हा सध्या पोर्तुगाल येथे वास्तव्यास असून तो व्हर्च्यअल आयडीद्वारे सुजीतच्या संपर्कात होता. सुजीतप्रमाणे या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी शुभम लोणकर आणि मोहम्मद जिशान अख्तर यांनाही या कटाची माहिती आधीपासून होती. हत्येसाठी त्यांनीच राजस्थानातून शस्त्रे आणून शूटरला दिली होती. सुजीत हा गेल्या तीन वर्षांपासून मोहम्मद जिशान अख्तरच्या संपर्कात होता. त्याच्याच सांगण्यावरुन सुजीत हा राम कनोजिया आणि नितीन सप्रे यांच्या संपर्कात आला.
काही महिने ते तिघेही सोशल मिडीयाद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. सुजीतने नंतर या दोघांना कटात सामिल करुन घेतले होते. अनमोलच्या सांगण्यावरुन सुजीतने नितीन आणि इतर आरोपींना बाबा सिद्धीकी यांच्या घरासह कार्यालयाची रेकी करण्यास सांगितले होते. हत्येच्या एक महिन्यांपूर्वी सुजीत पंजाबला पळून गेला आणि त्याने इतर आरोपींना मोहम्मद जिशान अख्तर याच्या संपर्कात राहण्याचे आदेश दिले होते. यावेळी तिन्ही शूटरांना २५ हजार रुपये पाठविण्यात आले होते. सुजीत स्वतची ओळख इतर आरोपींपासून लपवून ठेवली होती. त्याला सर्वजण बब्बू सिंग या नावाने ओळखत होते.
हत्येनंतर कोणी पकडला गेला तर तपास अधिकार्यांना त्याच्याबाबत संशय येणार नाही. कारण ते सर्वजण बब्बू सिंगच्या संपर्कात होते, त्याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही असे तो पोलिसांना सांगेल. सुजीतला पकडल्यानंतर त्याला बब्बू सिंगविषयी विचारणा करण्यात आली होती. यावेळी त्याने त्याचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. मात्र नंतर त्याने तोच बब्बू सिंग असल्याची कबुली दिली होती. याच गुन्ह्यांत सुजीत सध्या ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत असून त्याच्या चौकशीतून अनेक धक्कदायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.