कार डिलीव्हरीच्या नावाने खंडणी वसुली करणार्या टोळीचा पर्दाफाश
ओशिवरा पोलिसांची कारवाई; मुख्य आरोपीसह तिघांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ मार्च २०२४
मुंबई, – डिलीव्हरी कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी असल्याची बतावणी करुन एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी कंटेनरमधून सुरक्षित कार डिलीव्हरी करण्याचा बहाणा करुन कारचा अपहार करुन अतिरिक्त पैशांची मागणी करुन खंडणी वसुल करणार्या हरियाणाच्या एका टोळीचा ओशिवरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका मुख्य आरोपीसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पंकज हनुमान भारद्वाज, हनुमान दयानंद भारद्वाज आणि इम्रान अब्दुल गणी पठाण अशी या तिघांची नावे असून यातील पंकज हा या टोळीचा म्होरक्या आहे. या आरोपींकडून पोलिसांनी अपहार केलेले एक वाहन जप्त केले आहेत. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
यातील तक्रारदार अनुराग विनायक त्रिपाठी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरी येथे राहत असून व्यावसायिक आहेत. त्यांना त्यांची एक कार चेन्नईला पाठवायची होती. त्यामुळे कार डिलीव्हरीसाठी एका ट्रान्सपोर्ट कंपनीची माहिती काढण्यासाठी गुगलवर सर्च केले होते. त्यात त्यांना हनुमान कार ट्रान्सपोर्ट या कंपनीची माहिती मिळाली. तिथे दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर समोरील व्यक्तीने मुंबईहून चेन्नईला कार डिलीव्हरी करण्यासाठी दहा हजार लागतील असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला क्यूआर कोडवर पाच हजार रुपये पाठवून दिले. १२ फेब्रुवारीला त्यांची कार घेऊन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कर्मचारी चेन्नईला जातो असे सांगून निघून गेले. त्यानंतर त्याने त्यांच्याकडे ३१ हजार ५७६ रुपयांची मागणी करुन त्यांना काही बोगस पावत्या पाठवून दिल्या. ही रक्कम पाठविल्याशिवाय कार चेन्नईला पाठविणार नाही असे सांगितले.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कट रचून कारचा अपहारसह अतिरिक्त पैशांची मागणी करुन धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील, पोलीस निरीक्षक विजय माडये यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिपक बर्वे, पोलीस हवालदार शैलेश शिंदे, विनोद माने, सिराज मुजावर, पोलीस शिपाई उमेश सोयंके, अमोल सुतार, किशोर बोबडे, नवनाथ गिते, गणेश बोराटे यांनी तपासाला सुरुवात केली होती. आरोपींच्या मोबाईल क्रमांकावरुन पोलिसांनी त्यांचे लोकेशन काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इम्रानला तळोजा येथून ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने त्याचे बोगस नाव सांगून खोटे लोकेशनसह व्हिडीओ पाठविल्याची कबुली दिली. त्याच्याकडून अपहार केलेली कार पोलिसांनी जप्त केली होती. त्यांच्या चौकशीतून पोलिसांना इतर दोन्ही आरोपींची नावे समजली होती. ते दोघेही हरियाणा येथे वास्तव्यास असल्याने तिथे ओशिवरा पोलिसांची एक टिम पाठविण्यात आली होती. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली. ट्रॉन्झिंट रिमांड घेतल्यानंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर आरोपींना स्थानिक न्यायालयाने ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील पंकज आणि हनुमान मूळचे हरियाणा तर इम्रान हा मुंब्राचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हा करण्याची कार्यपद्धत
अनेकदा काहीजण त्यांचे वाहन एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पाठवायचे असल्यास ऑनलाईन पॅकर्स आणि मूव्हर्सला सर्च करत असल्याचे आरोपींना माहिती होती. त्यामुळे त्यांनी आधीच ऑनलाईन एक बोगस कंपनी वेबसाईटवर अपलोड केली होती. या वेबसाईटवर विविध मोबाईल क्रमांक दिले होते. तिथे संपर्क साधल्यानंतर समोरुन कंपनीची प्रतिनिधी म्हणून एक महिला ते कॉल अटेंड करते. त्यानंतर एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी गाडी पाठविण्यास लागणार्या खर्चापेक्षा खूप कमी दरात ते ग्राहकांना त्यांची कार डिलीव्हरीचे आश्वासन देत होते. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर कंपनीच्या वतीने काही कर्मचार्यांना त्यांनी दिलेल्या ठिकाणावर पाठविले जात. कंटेनरमध्ये कार लोड केल्यानंतर त्याचे व्हिडीओ, प्रवाशादरम्यानचे लोकेशन ग्राहकाला पाठवून त्यांची कार सुरक्षित डिलीव्हरी केली जाईल असे सांगून तेथून निघून जात होते. काही वेळानंतर कटातील मुख्य आरोपी पंकज हा हरियाणा येथून संबंधित व्यक्तीला कॉल करुन गाडी पुढे पाठवायची असल्यास टोल, जीएसटी, ट्रॉन्झिंट इन्शुरन्स, चेक पोस्ट चार्जेस, फोलिओ चार्जेस, असे विविध चार्जेससाठी पैशांची मागणी करुन त्यांना धमकी देत होता. पैसे दिले नाहीतर त्यांची गाडी नियोजित ठिकाणी पाठविणार नाही. वाहनाचे नुकसान करु अशी धमकी देऊन तो त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे घेत होता. अशा प्रकारे कट रचून या टोळीने आतापर्यंत अनेकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.