वयोवृद्ध आईची हत्या करुन मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
वरळीतील घटना; आरोपी मुलाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – वरळी येथे राहणार्या ललिता तिरुगनना संबनधहम या ७७ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची तिच्याच ५३ वर्षांच्या मुलाने हत्या करुन नंतर तिक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यात बालशनमुघम कुप्पूस्वामी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी बालशनमुघम याच्याविरुद्ध वरळी पोलिसांनी हत्येसह आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच त्याच्यावर अटकेची कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ही घटना शनिवारी रात्री बारा वाजता वरळीतील एल. आर पापन मार्ग, गांधीनगरातील शिवसंकल्प एसआरए सोसायटीमघ्ये घडली. याच सोसायटीच्या दुसर्या मजल्यावरील रुम क्रमांक २०७ ललिता संबनधहम ही वयोवृद्ध महिला राहत होती. बालशनमुघम हा तिचा मुलगा असून तो सध्या पेडर रोड, जसलोक हॉस्पिटलजवळील दरभंगा हाऊसच्या फ्लॅट क्रमांक २३ मध्ये राहतो. त्याच्यावर लाखो रुपयांचे कर्ज होते. याच कर्जावरुन त्याचे त्याच्या आईसोबत वाद झाला होता. शनिवारी रात्री तो तिच्या वरळीतील घरी आला होता. यावेळी त्यांच्यात कर्जावरुन प्रचंड वाद झाला होता. याच वादानंतर त्याने ललिता यांच्या तोंडावर नॅपकीन ठेवून हाताने तोंड आणि नाक दाबून तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने तिक्ष्ण हत्याराने स्वतच्या गळ्यावर वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
हा प्रकार स्थानिक रहिवाशांकडून समजताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी ललिता आणि बालशनमुघम या दोघांनाही पोलिसांनी जवळच्या नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे ललिता यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. बालशनशुघमची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल राजमाने यांच्या बालशनमुघम याच्याविरुद्ध वरळी पोलिसांनी हत्येसह आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासात बालशनमुघम हा त्याच्या पत्नीसोबत पेडर रोडला राहत असून ती सरकारी कर्मचारी आहे. तिला पेडर रोडवर सरकारी फ्लॅट मिळाला होता. बालशनमुघम हा बेरोजगार असून गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून तो बेरोजगार होता. त्यातच त्याला कर्ज झाले होते. त्यामुळे त्याचे त्याची आई ललिताशी पैशांवरुन वाद सुरु होता. ललिता ही वरळी येथे एसआरएच्या भाड्याच्या रुममध्ये राहत होती. कर्जाच्या पैशांवरुन होणार्या वादातून त्याने त्याच्या आईची हत्या करुन नंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.