मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बँकेत डिपॉझिट करण्यासाठी दिलेल्या सुमारे साडेसहा लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी राज रविंद्र वाल्हे या २६ वर्षांच्या कंपनीच्या ऑफिस बॉयला एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच काही तासांत अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून काही रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याचे बोलले जाते.
खुशाल गोपाललाल अग्रवाल हे अंधेरीतील रहिवाशी असून त्यांची फिनविल ऍडवायजर प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक खाजगी कंपनी आहे. या कंपनीत ते स्वत संचालक म्हणून काम करत असून त्यांचे दोन पार्टनर आहेत. कंपनीत एकूण तीस कर्मचारी कामाला असून त्यात राज वाल्हे याचा समावेश होता. तो ३ ऑक्टोंबर २०२४ पासून कंपनीत ऑफिसबॉय म्हणून कामाला लागला होता. त्यांच्या कंपनीने एका कंपनीला सेवा पुरविली होती. या कंपनीकडून त्यांना बारा लाख रुपये येणे बाकी होते. २२ ऑक्टोंबरला कंपनीचा एक कर्मचारी बारा लाख रुपयांचे पेमेंट घेऊन त्यांच्या अंधेरीतील कार्यालयात आला होता. त्यापैकी साडेदहा लाख रुपये त्यांनी राज वाल्हे याला बँकेत डिपॉझिट करण्यासाठी दिली होती. त्यानंतर ते लोअर परेल येथे कामानिमित्त निघून गेले होते. दुपारी पावणेतीन वाजता राज हा पैसे डिपॉझिट करण्यासाठी बॅकेत निघून गेला. मात्र बराच वेळ होऊन तो ऑफिसला परत आला नाही. त्यामुळे तेजल नावाच्या कर्मचारी महिलेने त्याला कॉल केला होता. मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. सायंकाळपर्यंत राज आला नव्हता. तसेच पैसे डिपॉझिट झाल्याचा मॅसेज तिला आला नव्हता.
हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने रुबी सिंग हिला बँकेत पाठविले होते. रुबी बँकेत गेली असता तिला राज तिथे आलाच नसल्याचे समजले. त्यामुळे तेजलने एका कर्मचार्याला राजच्या अंधेरीतील महाकाली रोड, चकाला, हनुमान नगातील एकता चाळीतील घरी पाठविले होते. मात्र तो घरी नसल्याचे या कर्मचार्याच्या निदर्शनास आले. बँकेत डिपॉझिट करण्यासाठी दिलेली साडेसहा लाखांची कॅश घेऊन राज पळून गेल्याची खात्री होताच तिने ही माहिती खुशाल अग्रवाल यांना दिली होती. या माहितीनंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसात राज वाल्हेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता.
ही शोधमोहीम सुरु असतानाच पळून गेलेल्या राज वाल्हे याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. त्याच्याकडून पोलिसांनी काही कॅश हस्तगत केली असून उर्वरित कॅश लवकरच जप्त केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.