फ्लॅटसाठी अठरा लाख रुपये घेऊन वयोवृद्ध महिलेची फसवणुक
पाच महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बोरिवलीसह कल्याण येथील दोन फ्लॅटसाठी सुमारे १८ लाख रुपये घेऊन एका वयोवृद्ध महिलेची फसवणुक केल्याच्या कटातील एका वॉण्टेड मुख्य आरोपीस पाच महिन्यानंतर एमएचबी पोलिसांनी अटक केली. योगेश ज्ञानेश्वर घाटकर असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
७३ वर्षांची वयोवृद्ध महिला दिपा गोपीनाथ भालेकर ही बोरिवलीतील एलआयसी कॉलनी परिसरात राहते. अकरा वर्षांपूर्वी तिने एका दैनिकात बँकेतर्फे ऑक्शनमध्ये निघालेल्या फ्लॅटची जाहिरात पाहिली होती. हा फ्लॅट घेण्याची इच्छा असल्याने तिची ओळख योगेश घाटकरशी झाली होती. त्याने त्याच्याकडे बोरिवली व कल्याण येथे दोन फ्लॅटसह शहापूर येथे एक प्लॉट विक्रीसाठी आल्याचे सांगितले. यावेळी दिपा व तिचा मुलगा शेखर भालेकर यांनी त्याला बोरिवली व कल्याण येथील दोन्ही फ्लॅटसाठी ते इच्छुक असल्याचे सांगून त्यांच्याशी फ्लॅटचा व्यवहार सुरु केला होता. या फ्लॅटची किंमत तीस लाख रुपये होती. त्यामुळे त्यांनी त्याला ऑगस्ट २०१२ ते नोव्हेंबर २०१३ या कालावधीत सुमारे २१ लाख रुपये दिले होते. या रक्कमेनंतर त्याने त्यांना यशराज असोशिएट्स बिल्डर ऍण्ड डेव्हल्पर या नावाने पावती दिली होती. उर्वरित कॅश जमा करणे शक्य होत नसल्याने दिपा भालेकरने योगेशचा कर्मचारी निलेश सागवेकर याला साडेतेरा तोळ्याचे सुमारे चार लाख पाच हजार रुपयांचे दागिने दिले होते.
अशा प्रकारे दिपाने योगेशला फ्लॅटसाठी कॅश स्वरुपात एकवीस लाख आणि चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असे २५ लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा एक एमओयु बनविण्यात आला होता. त्यात कल्याण येथील ४३० चौ. फुटाचा फ्लॅट १२ लाख ४० हजार रुपयांची विक्री करत असून त्यापैकी त्याला साडेपाच लाख रुपये प्राप्त झाल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने दोन्ही फ्लॅटचा ताबा दिला नाही. विचारणा केयानंतर तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. फ्लॅटसाठी पैसे घेऊन योगेश घाटकर फ्लॅटचा ताबा देण्यास विलंब लावत होता. त्यामुळे २०१४ साली तिने योगेशविरुद्ध एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. ही माहिती समजताच त्याने त्यांना फ्लॅटचा ताबा लवकर देतो सांगून त्यांना तक्रार मागे घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध घेतलेली तक्रार मागे घेतली होती. मात्र नंतर त्याने दिलेल्या मुदतीत फ्लॅट दिला नाही. त्याच्यासोबत व्यवहार न पटल्याने तिने तिच्या कॅशसहीत दागिन्यांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने तिला पाच लाखांचा एक धनादेश दिला होता. मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. त्यानंतर त्याने तिला सात लाख रुपये परत केले.
मात्र गेल्या सहा ते सात वर्षांपासून तो तिला उर्वरित रक्कम देण्यास टाळण्याचा प्रयत्न करत होता. विचारणा केल्यानंतर तो तिला शिवीगाळ करुन धमकी देऊ लागला होता. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध एमएचबी पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह शिवीगाळ करुन धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. गेल्या पाच महिन्यांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना तीन दिवसांपूर्वी त्याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने कल्याण आणि बोरिवली येथे दोन फ्लॅट देतो असे सांगून दिपा भालेकर या वयोवृद्ध महिलेची सुमारे अठरा लाखांची फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.