मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – विक्रीसाठी घेतलेल्या १ कोटी २६ लाख रुपयांच्या हिर्यांचा अपहार करुन एका खाजगी हिरे कंपनीची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही हिरे दलालाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अशोक तुलसीभाई लुखी आणि अनिल तुलसीभाई लुखी अशी या दोघांची नावे असून पळून गेलेल्या या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
संजय जयरामभाई बोदरा हे मलबार हिल परिसरात राहत असून आर जयकुमार ऍण्ड कंपनीत सेल्स एक्झक्युटिव्ह म्हणून कामाला आहे. त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्स, एफसी टॉवरसमोर आहे. २० ऑक्टोंबरला हिरे दलाल असलेले अशोक आणि अनिल लुखी हे दोघेही त्यांच्या कार्यालयात आले होते. या दोघांनी त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना त्यांच्या परिचित हिरे व्यापारी आहेत. या व्यापार्यांना चांगल्या हिर्यांची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या हिर्यांना चांगला भाव मिळवून देतो असे सांगितले. त्यानंतर हिरे व्यापार्यांना विक्रीसाठी त्यांच्याकडून त्यांनी ११ हजार १२१ कॅरेटचे १ कोटी २६ लाख ५३ हजार रुपयांचे हिरे घेतले होते. एका आठवड्यात हिरे किंवा हिर्यांच्या विक्रीतून आलेले पेमेंट करण्याचे आश्वासन दिले.
मात्र एक आठवडा उलटूनही ते दोघेही हिरे घेऊन आले नाही किंवा हिर्यांचे पेमेंट कंपनीत जमा केले नाही. त्यामुळे त्यांनी या दोन्ही हिरे दलालांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. नंतर त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. विक्रीसाठी घेतलेले हिरे घेऊन ते दोघेही पळून गेले होते. हा प्रकार लक्षात येताच संजय बोदरा यांनी बीकेसी पोलिसांत दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अशोक लुखी आणि अनिल लुखी या दोन्ही दलालाविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्याकडून विक्रीसाठी हिरे घेऊन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.