मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – आई कामावर गेल्यानंतर घरात एकटीच असलेल्या सोळा वर्षांच्या मुलीचा तिच्याच पित्यानेच अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी पित्याला मालवणी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
१६ वर्षांची बळीत मुलगी ही मालाडच्या मालवणी परिसरात तिच्या पालकासोबत राहत असून ती सध्य शिक्षण घेत आहे. ३५ वर्षांचा आरोपी तिचे वडिल असून त्याचे त्याच्या मुलीवर वाईट नजर होती. २१ ऑक्टोंबर ते २५ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत मुलीची आई कामावर निघून गेल्यानंतर ती एकटीच घरी होती. यावेळी तिच्या वडिलांनी तिच्या छातीला अनेकदा नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. तिच्याशी अश्लील संभाषण करुन तिला शिवीगाळ केली होती. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. सुरुवातीला तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र वडिलांकडून मानसिक शोषण सुरुच राहिल्यानंतर तिने हा प्रकार शुक्रवारी तिच्या आईला सांगितला. तिने तिला तिच्या वडिलांविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्या दोघीही मालवणी पोलीस ठाण्यात आल्या होत्या. या मुलीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगून तिच्या वडिलांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीस त्याच्या राहत्या घरातून शनिवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.