झिशान सिद्धीकीच्या सुरक्षेसाठी असलेला हवालदार निलंबित
बंदोबस्तात हलगर्जीपणा; विभागीय चौकशी सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत नुकताच प्रवेश केलेले आमदार झिशान सिद्धीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. विशाल अशोक ठाणगे असे या हवालदाराचे नाव असून त्याच्यावर बंदोबस्तात हलगर्जीपणाचा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम यांनी सुरक्षेची पाहणीसाठी अचानक भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
१२ ऑक्टोंबरला बाबा सिद्धीकी यांची झिशान सिद्धीकी यांच्या कार्यालयाबाहेरच तीन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येप्रकरणी आतापर्यंत पंधरा आरोपींना पोलिसांना अटक केली असून हत्येमागे बिष्णोई टोळी असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या हत्येनंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्धीकी यांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. त्यांच्या जिवाला असलेला संभाव्य धोका पाहता त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस हवालदार विशाल ठाणगे याच्यावर सोपविण्यात आली होती. अलीकडेच झिशान सिद्धीकी यांनी पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम यांची भेट घेऊन त्यांच्या सुरक्षेबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या तक्रारीची पोलीस उपायुक्तांनी गंभीर दखल घेत झिशान सिद्धीकी यांच्या घरी अचानक भेट दिली होती.
या भेटीदरम्यान पोलीस हवालदार विशाल ठाणगे हा तिथे उपस्थित नव्हता. तो गायब असल्याचे दिसून आले. या घटनेची दिक्षीत गेडाम यांनी गंभीर दखल घेत विशाल ठाणगे याला निलंबित केले आहे. तसेच त्याची विभागीय चौकशीचे आदेश जारी केले आहे. पोलीस उपायुक्तांनी अचानक झिशान सिद्धीकी यांच्या घरी भेट दिली, त्यावेळेस तो कुठे होता. यापूर्वीही त्याने बंदोबस्तात हलर्जीपणा केला होता का याचा पोलिसाकडून तपास सुरु आहे. याबाबत लवकरच तपास करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे विशाल ठाणगे याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.