२४ लाखांचे सोन्याचे पिसेस घेऊन नोकराचे पलायन

पळून गेलेल्या नोकराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सुमारे २४ लाख रुपयांचे सोन्याचे पिसेस चोरी करुन दुकानातील नोकराने पलायन केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधो शेख या नोकराविरुद्ध मालाड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. तो त्याच्या गावी पळून गेल्याची शक्यता असल्याने एक टिम लवकरच त्याच्या गावी जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आलोक जवाहर सागर हे कांदिवलीतील महावीरनगरचे रहिवाशी असून त्यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. मालाडच्या काचपाडा परिसरात त्यांच्या मालकीचे कृष्णा बँगल्स नावाचे एक दुकान आहे. या ठिकाणी ४० कामगार कामाला आहेत. या कामगारांना सोन्यासह इतर साहित्य दिल्यानंतर ते त्यांना सोन्याचे दागिने बनवून देतात. त्यानंतर ते सोन्याचे दागिने दुकानातील तिजोरीत सुरक्षित ठेवले जाते. त्यांच्याकडे बुधो शेख हा एप्रिल २०२४ पासून कामााला होता. सकाळी नऊ वाजता कामावर आल्यानंतर रात्री काम संपूनच तो घरी जात होता. कामात हुशार असल्याने त्यांचा त्याच्यावर प्रचंड विश्‍वास होता. २२ ऑक्टोंबरला बुधो हा नेहमीप्रमाणे कामावर आला आणि नंतर काही कारण सांगून दुकानातून निघून गेला होता. त्याला कॉल केल्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. नंतर कामात व्यस्त राहिल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

२६ ऑक्टोंबरला त्यांनी तिजोरीतून सोन्याचा कच्चा माल बाहेर काढला, त्याचे वजन कमी दिसून आल्याने त्यांनी दुकानातील कामगारांकडे चौकशी केली होती. मात्र याबाबत कोणालाही काहीच माहिती नव्हती. त्यातच बुधो हा चार दिवसांपासून अचानक कामावर येणे बंद झाला होता. त्यामुळे त्याने तिजोरीतून २४ लाख ५० हजार रुपयांचे ३०० ग्रॅम वजनाचे २५० सोन्याचे पिसेस चोरी करुन पलायन केले असावा असा संशय व्यक्त केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात बुधो शेखविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page