मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – औरंगाबाद येथून आई-वडिलांसह भावडांसोबत मुंबईत आलेल्या एका चार वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेर घडली. याप्रकरणी अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध कुर्ला रेल्वे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक रेल्वे पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. रेल्वे स्थानकासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या अपहरणकर्त्यांचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी सांगितले.
यातील तक्रारदार मूळचे औरंगाबादचे रहिवाशी असून ते त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत राहतात. दरवर्षी ते त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी सणापूर्वी मुंबईत येतात. कुर्ला परिसरात दिवसभर भीक मागून रात्रीच्या वेळेस जवळच्या फुटपाथवर झोपतात. गेल्याच आठवड्यात ते त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत मुंबईत आले होते. रविवारी रात्री ते त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा-टॅक्सी स्टॅण्डजवळील फुटपाथवर झोपले होते. सोमवारी पहाटे पाच वाजता त्यांना जाग आली. यावेळी त्यांना त्यांचा चार वर्षांचा मुलगा तिथे दिसला नाही. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या पत्नीने त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र बराच वेळ शोध घेऊन तो सापडला नाही. त्यानंतर त्यांनी कुर्ला रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्यांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. चार वर्षांच्या मुलाच्या अपहरणाच्या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर पोलिसांनी रेल्वे स्थानकासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा शोध सुरु केला आहे.