मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या आमदार पूत्र झिशान सिद्धीकी यांना मॅसेजद्वारे खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी नोएडा येथून गुरफान खान नावाच्या एका तरुणाला निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. गुरफान हा टॅटू आर्टिस्ट तरुण असून दहशतीसह पैशांची गरज असल्याने त्याने झिशान सिद्धीकीसह सिनेअभिनेता सलमान खान यांना खंडणीसाठी धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान अटकेनंतर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणलेल्या गुरफानला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
रितेश गणेश मोरे हे वांद्रे येथील कार्डिनल स्कूलजवळील सिद्धार्थ कॉलनी, २५ ट्रॉन्झिंट कॅम्प परिसरात राहत असून आमदार झिशान सिद्धीकी यांच्याकडे टायपिस्ट म्हणून नोकरीस आहे. झिशान यांचे वांद्रे येथील खेरनगर परिसात जनसंपर्क कार्यालय आहे. याच कार्यालयात जनतेच्या संपर्कासाठी एक मोबाईल क्रमांक ठेवण्यात आला होता. २५ ऑक्टोंबरला सायंकाळी सात वाजता एका अज्ञात व्यक्तीने संबंधित मोबाईलवर एक मॅसेज पाठविला होता. त्यात झिशान सिद्धीकी यांना जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्यासह सलमान यांना धमकावून खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणीची ही रक्कम दिली नाहीतर परिणाम वाईट होतील असे नमूद करण्यात आले होते. हा मॅसेज रितेश मोरेकडून झिशान सिद्धीकी यांना देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या वतीने रितेशने निर्मलनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत निर्मलनगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना हा मॅसेज नोएडा येथून आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या पथकाने नोएडा येथून गुरफानला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच खंडणीच्या धमकीचा हा मॅसेज पाठविल्याची कबुली दिली. गुरफान हा बेरोजगार असून टॅटू आर्टिस्ट म्हणून काम करत होता. त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे दशहत निर्माण करणे तसेच पैशांसाठी त्याने हा मॅसेज पाठविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या घटनेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.