गुन्हा दाखल करण्यासाठी लाचेची मागणी करणे महागात पडले
पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन अडीच हजार रुपयांची लाच स्विकारण्याची तयारी दर्शविणे एका पोलीस उपनिरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी संगमेश्वर गोपाळराव एकाळे या पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. संगमेश्वर एकाळे हा वनराई पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांच्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या सहकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदाराच्या अशिलाची एका व्यक्तीने फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्यांच्या अशिलाच्या वतीने वनराई पोलीस ठाण्यात एक तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करण्याची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक संगमेश्वर एकाळे यांच्यावर सोपविण्यात आली होती. तक्रार अर्ज करुनही त्यांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला नव्हता. त्यामुळे ते स्वत त्यांना भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी संगमेश्वर एकाळे यांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांच्याकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच दिल्याशिवाय त्यांच्याकडून गुन्हा दाखल होणार नाही याची खात्री झाल्याने त्यांनी ती लाच देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात संगमेश्वर एकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीची संबंधित अधिकार्यांनी शहानिशा करण्यात आली होती.
१९ ऑक्टोबरला रोजी करण्यात आलेल्या या शहानिशादरम्यान संगमेश्वर एकाळे यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन चर्चेअंती अडीच हजार रुपये घेण्याचे मान्य केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कलम ७ भष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत संगमेश्वर एकाळे यांच्यावर अटकेची कारवाई झाली नाही. मात्र त्यांची लवकरच संबंधित अधिकार्यांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.