मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – पार्क केलेल्या वाहनामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने कारवाईसाठी गेलेल्या एका पोलीस शिपायाशी दोन तरुणांनी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध डी. एन नगर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश शिवराम हालीकेड आणि सचिन सुरेंद्र यादव अशी या दोघांची नावे असून या गुन्ह्यांत दोघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
ही घटना रविवारी दुपारी दिड वाजता अंधेरीतील जे. पी रोड, स्पोटर्स कॉम्प्लेक्स, वाडिया हायस्कूलजवळ घडली. प्रमोद बाबासाहेब पालवे हे पोलीस शिपाई असून सध्या ते डी. एन नगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. रविवारी दुपारी वाडिया हायस्कूलजवळ काही लोकांनी नो पार्किंगमध्ये त्यांचे वाहन लावली होती. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे प्रमोद पालवे यांनी तिथे उपस्थित वाहनचालक सचिन यादव आणि प्रकाश हालीकडे यांना वाहने काढण्यास सांगितले. याच कारणावरुन या दोघांनी त्यांच्याशी वाद घालून त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी प्रमोद पालवे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांत त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.