झोपड्या हटवून जागा रिकामी करण्यासाठी दिलेल्या पैशांचा अपहार
४ कोटी ६१ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ मार्च २०२४
मुंबई, – पुर्नविकासाच्या जागेवरील अधिकृत व अनधिकृत झोपड्या हटवून जागा रिकामी करण्यासाठी दिलेल्या ४ कोटी ६१ लाख रुपयांचा अपहार करुन एका खाजगी कंपनीची फसवणुक झाल्याचा प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिनेश कन्हैय्यालाल जैन या व्यावसायिकाविरुद्ध नवघर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. दिनेश हा बालाजी डेव्हलपर्स कंपनीचा मालक असून त्याच्याच कंपनीला संबंधित कंत्राट देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
उमेश शाम कांबळे हे कुर्ला येथील नेहरुनगरचे रहिवाशी असून मुलुंड परिसरातील रिचा रियल्टअर्स या बांधकाम क्षेत्राशी संबंधित कंपनीत गेल्या २५ वर्षांपासून वरिष्ठ उपाध्याक्ष म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीने मुलुंडच्या पीएमजीपी कॉलनीच्या सीटीएम क्रमांक १३२० या जागेवरील ५६ इमारतीच्या पुर्नविकास करण्याचे काम हाती घेतले होते. याबाबत त्यांच्या कंपनीचे म्हाडासोबत एक करार झाला होता. पुर्नविकास करारानंतर तिथे राहणार्या १४७० भाडेकरुसोबत त्यांच्या कंपनीशी वैयक्तिक करारनामा झाला होता. त्यानंतर तो प्लॉन महानगरपालिकेत मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यांच्याकडून आयओडी आणि सीसी प्राप्त होताच जुन्या इमारती पाडण्यात आल्या.
म्हाडाच्या याच जागेवर ११३ झोपड्या होत्या. त्यापैकी ७२ झोपड्या अनधिकृत होत्या. या झोपड्या हटविण्यासाठी कंपनीने दिनेश जैनच्या मालकीची बालाजी डेव्हल्पर्स कंपनीची नियुक्ती केली होती. या कंपनीला सर्व झोपड्या हटविणे, जागा रिकामी करुन देणे, माती लेवल करुन प्लॉटच्या जागेवर पत्रा मारणे आदी कंत्राट देण्यात आले होते. याबाबत झालेल्या एका बैठकीत दिनेश जैन यांनी कंपनीच्या सर्व अटी मान्य करुन त्यांना संपूर्ण जागा रिकामी करुन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांच्या कंपनीसोबत त्यांचा एक करार झाला होता. मे २०११ ते एप्रिल २०२३ या कालावधीत याच कामासाठी दिनेश जैन यांच्या कंपनीला कॅश आणि बँक ट्रान्स्फरच्या माध्यमातून ४ कोटी ६१ लाख रुपयांचे पेमेंट करण्यात आले होते.
याच दरम्यान दिनेशने ३६ अनधिकृत झोपड्या हटविण्यात आले असून उर्वरित झोपड्या लवकरच हटविण्यात येईल कंपनीला सांगितले होते. त्यामुळे कंपनीच्या वतीने राजन गावडे आणि अशोक पुरोहित यांना जागेची प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठविण्यात आले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना एकही झोपडी हटविण्यात आली नसल्याचे दिसून आले. दिलेल्या वेळेत काम पूर्ण न केल्यानंतर त्यांच्या कंपनीला त्यांच्या भागीदार कंपनीने सुमारे ९० कोटीची पेनेल्टी लावली होती. याबाबत दिनेशला विचारणा केल्यानंतर त्याने काही दिवसांत संपूर्ण झोपड्या हटविण्याचे आश्वासन दिले. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने ते काम पूर्ण केले नाही. त्यामुळे उमेश कांबळे यांच्या रिचा कंपनीने दुसर्या कंपनीने संबंधित कंत्राट दिले होते.
अशा प्रकारे दिनेश जैनने झोपड्या हटवून जागा रिकामी करणे, माती लेवल करुन पत्रा लावण्याचे दिलेल्या कंत्राटाच्या ४ कोटी ६१ लाखांचा अपहार करुन रिचा कंपनीची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच उमेश कांबळे यांनी नवघर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दिनेश जैनविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.