सोन्याच्या दागिन्यांसह हिर्यांचा अपहार करुन फसवणुक
झव्हेरी बाजार-काळबादेवीतील ज्वेलर्स व्यापार्यांना गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – विक्रीसाठी घेतलेल्या सुमारे दिड कोटीच्या हिर्यांसह सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन दोन ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक झाल्याचा प्रकार झव्हेरी बाजार आणि काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या अरविंदकुमार सोनी आणि विनोद प्रकाशचंद्र मेहता ऊर्फ विनोद जैन यांचा शोध सुरु आहे. या दोघांनी हिरे आणि विविध डिझाईनचे मंगळसूत्र घेऊन त्याचे पेमेंट न करता दोन्ही व्यापार्यांची फसवणुक केल्याचा आरोप आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार भरत ओटरमल जैन हे भायखळा परिसरात राहत असून व्यवसायाने ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांचा काळबादेवी येथील विठ्ठलवाडी, पोतदार इमारतीमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीचा व्यवसाय आहे. विनोद मेहता हा त्यांच्या परिचित ज्वेलर्स व्यापारी आहे. जून आणि जुलै महिन्यांत त्याने त्यांचा कर्मचारी पन्नासिंग आणि सहकारी मयंक पामेचा यांच्यामार्फत त्यांच्याकडून १ कोटी ११ लाख ७२ हजार रुपयांचे १६१९ ग्रॅम वजनाचे विविध मंगळसूत्र घेतले होते. पंधरा दिवसांत दागिन्यांचे पेमेंट करण्याचे आश्वासन देऊन त्याने दागिन्यांचे पेमेंट केले नाही. विचारणा केल्यानंतर तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे विक्रीसाठी घेतलेले दागिने परत करण्यास सांगितले, मात्र त्याने दागिनेही परत केले नाही. विविध सोन्याचे मंगळसूत्र घेऊन विनोद मेहता हा पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केत्यानंतर विनोद मेहताविरुद्ध पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना झव्हेरी बाजार परिसरात घडली. आकाश मुकेशजी सुराणा हे व्यापारी असून त्यांचा सोने, प्लॅटिनयम, हिरेजडीत दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी अरविंदकुमार सोनी हा गुजरातच्या अहमदाबादचा रहिवाशी असून तिथेच त्याच्या मालकीचे तमन्ना ज्वेलर्स नावाचे एक शॉप आहे. फेब्रुवारी २०२२ ते २८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत त्याने त्यांच्याकडून १ कोटी ४८ लाख रुपयांचे सोने, प्लॅटिनम आणि हिरेजडीत दागिने घेतले होते. त्यापैकी १ कोटी अकरा लाख रुपयांचे पेमेंट केले, मात्र पाच ते सहा उलटूनही त्याने उर्वरित ३७ लाख ४१ हजार रुपयांचे पेमेंट न करता त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी अरविंदकुमारविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विनोद मेहता आणि अरविंदकुमार सोनी हे दोघेही पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.