मनपामध्ये कायमस्वरुपी नोकरीसाठी ४० लाखांना गंडा

प्ले ग्रुप चालविणार्‍या महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – महानगरपालिकेत कायमस्वरुपी नोकरीसाठी एका प्ले ग्रुप शाळा चालविणार्‍या महिलेला एका ठगाने सुमारे ४० लाखांना गंडा घातल्याचा प्रकार ट्रॉम्बे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिद्धार्थ अंकुश गायकवाड या ठगाविरुद्ध ट्रॉम्बे पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सिद्धार्थने तक्रारदार महिलेच्या भावासह इतर दोन नातेवाईकांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिची ४० लाख रुपये घेऊन पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

काजल राजेश वरळीकर ही महिला ट्रॉम्बे परिसरात तिच्या पती आणि मुलासोबत राहते. ती मंडाळा कॉलनीत प्ले ग्रुप नर्सरी चालवत असून तिचे पती एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. दोन वर्षांपूर्वी तिची ओळख चेंबूर येथील वाशीनाका, राहुलनगरचा रहिवाशी असलेल्या सिद्धार्थ गायकवाडशी झाली होती. त्याने त्याचा भाऊ किरण गायकवाड हा महानगरपालिकेच्या सफाई विभागात चांगल्या पदावर कामावर असल्याचे सांगितले. त्याची मनपामध्ये चांगली ओळख असून काही गरजू उमेदवार असतील तर तो त्यांना मनपामध्ये ोकरी मिळवून देईल असे सांगितले होते. काजलला तिचा भाऊ राजेश विष्णू सलामवाडे, चुलत भाऊ ओमकार गरुड आणि भाची नेहा नितीन सहाने यांना नोकरीची गरज असल्याचे त्यांच्यासाठी नोकरीसाठी प्रयत्न करा अशी विनंती केली होती. यावेळी त्याने या तिघांना मनपामध्ये कायमस्वरुपी नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर त्याने त्यांचा ऑनलाईन अर्ज भरुन त्यात त्यांची शैक्षणिक कागदपत्रे अपलोड केली होती.

काही दिवसांनी त्यांनी तिन्ही उमेदवारांना मेडीकलसाठी केईएम हॉस्पिटलमध्ये पाठविले होते. तिथे मेडीकल झाल्यानंतर त्यांना लवकरच नोकरीचे नियुक्तीपत्र मिळेल असे सांगितले. या तिघांच्या नोकरीसाठी सिद्धार्थने तिच्याकडून काही रक्कम घेतली होती. मात्र पैसे देऊनही त्यांना नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाले नाही. ऑक्टोंबर २०२३ रोजी तिला सिद्धार्थचा भाऊ किरण गायकवाड भेटला होता. या भेटीत त्याने तिला सिद्धार्थला एका गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये आहे. त्याने नोकरीसाठी घेतलेले पैसे तुम्हाला परत करतो असे सांगून पलायन केले होते. मात्र त्यानेही त्यांचे पैसे परत केले नाही. दोन महिन्यानंतर सिद्धार्थ हा जामिनावर बाहेर आला होता. यावेळी त्याने तिला तिघांना नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांचे नियुक्तीपत्र देण्यासाठी त्याला आणखीन पैसे द्यावे लागतील असे सांतिले. त्यामुळे तिने त्याच्यावर विश्‍वास ठेवून तिने त्याला पुन्हा काही कॅश दिली होती. डिसेंबर २०२३ रोजी त्याने तिला नेहाचे बोगस नियुक्तीचे पत्र दिले, लवकरच इतर दोघांनाही नियुक्तीपत्र दिले जाईल असे सांगून तो निघून गेला.

मात्र दिलेल्या मुदतीत त्याने इतर दोघांचे नियुक्तीपत्र दिले नाही तसेच नेहाला दिलेले नियुक्तीपत्र बोगस असल्याचे तिच्या लक्षात आले होते. अशा प्रकारे गेल्या दोन वर्षांत सिद्धार्थने काजल वरळीकर या महिलेला तिच्या तीन नातेवाईकांना मनपामध्ये कायमस्वरुपी नोकरीचे आमिष दाखवून तिची सुमारे ४० लाखांची ुफसवणुक केली होती. तसेच विचारणा केल्यानंतर त्याने तिला शिवीगाळ करुन धमकी दिली होती. या घटनेनंतर तिने ट्रॉम्बे पोलिसांत सिद्धार्थ गायकवाड याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. सिद्धार्थने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page