मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – गोवंडी येथे राहणार्या एका वयोवृद्धाशी मैत्री करुन सोने खरेदीसाठी लंडनहून मुंबईत येत असल्याचे सांगून विदेशी चलनासह आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडल्याची बतावणी करुन संबंधित वयोवृद्धाची दोन अज्ञात महिलांनी ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही महिलांविरुद्ध गोवंडी पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांकडून संमातर तपास सुरु आहे.
८३ वर्षांचे तक्रारदार गोवंडीतील देवनार परिसरात राहत असून ते व्यवसायाने वकिल आहेत. त्यांची एक मुलगा आणि मुलगी विदेशात वास्तव्यास आहे तर दुसरा मुलगा त्याच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव येथे राहतो. ८ ऑक्टोंबरला ते त्यांच्या घरी होते, यावेळी त्यांना अमेलिया फ्लोरिडा नावाच्या एका अज्ञात महिलेचा मॅसेज आला होता. तिने त्यांच्या मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी तिला होकार दर्शविला होता. चर्चेदरम्यान तिने त्यांना ती लंडन येथे राहत असून तिचा रिअल इस्टेटचा व्यवसाय असल्याचे सांगितले. तिचा आई-वडिलांचा हा व्यवसाय असून सध्या ती त्यांचा व्यवसाय सांभाळते असे सांगितले होते. तिच्या एका नातेवाईकांचा स्वीडन येथे सोन्याचा व्यवसाय आहे. त्यासाठी तिला एका नामांकित कंपनीचे ज्वेलरी हवे आहेत, ती लवकरच भारतात येणार असल्याचे सांगून याकामी त्यांनी तिला मदत करण्याची विनंती केली होती.
२४ ऑक्टोंबरला ती लंडनहून दिल्ली आणि दिल्लीतून ट्रेनने मुंबईत येणार होती. तिच्या प्रवासाचे तिकिट तिने त्यांना व्हॉटअपवर पाठवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. २४ ऑक्टोंबरला सकाळी अकरा वाजता तिने त्यांना फोन करुन तिला दिल्ली विमानतळावर पकडले आहे. तिच्याकडे एक लाख युके पौंड सापडले आहेत, त्यामुळे तिला काही रक्कम टॅक्स म्हणून भरावे लागणार आहे. त्यामुळे त्यांनी तिला ९६ हजार रुपये पाठवून दिले. त्यानंतर तिने ऍण्टी मनी लॉंड्रिंगसाठी आणखीन काही पैसे भरावे लागतील असे सांगून त्यांच्याकडून २ लाख ३५ हजार रुपये एका बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगतले होते. यावेळी तिने दिल्ली कमिशनर कार्यालयातील एका महिलेशी त्यांचे संभाषण करुन दिले होते. अशा प्रकारे तिने विविध कारण सांगून त्यांना सहा लाख एकतीस हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले. ही रक्कम तिने त्यांना परत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी ती रक्कम त्यांनी तिला पैसे ट्रान्स्फर केले होते.
ही रक्कम पाठवूनही तिने रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडमध्ये पौंडमधील रक्कम भारतीय चलनात रुपांतरीत करण्यासाठी आणखीन ६ लाख ६५ हजाराची मागणी केली. मात्र त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी ती रक्कम देण्यास नकार दिला. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी संबंधित बँकेची चौकशी केली होती. यावेळी गुडगाव येथे अशी कोणतीही बँक नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या दोन्ही महिलांनी फसवणुकीच्या उद्देशाने मैत्री करुन त्यांना विविध कारणासाठी पैसे पाठविण्यास प्रवृत्त केले आणि त्यांची सहा लाख एकतीस हजाराची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी सायबर हेल्पलाईनसह गोवंडी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोन्ही महिलांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेल पोलिसांकडून संमातर तपास सुरु आहे.