४ कोटी ४४ लाखांचे पेमेंटचा अपहार करुन फसवणुक
कंपनीच्या अधिकार्यासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – मालाची डिलीव्हरीनंतर एक महिन्यांत पेमेंट करण्याचे आश्वासन देऊन ४ कोटी ४४ लाख रुपयांचा पेमेंटचा अपहार करुन एका खाजगी कंपनीची आर्थिक फसवणुक झाल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या एका अधिकार्यासह तिघांविरुद्ध वनराई पोलिसांनी कराराचे बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. देव शर्मा, विक्रम जैन आणि मनिष अशी या तिघांची नावे असून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
प्रशांत हरी शेट्टीकर हे मिरारोडचे रहिवाशी आहेत. ते गेल्या २५ वर्षांच्या त्यांच्या कुटुंबियांसोबत मिरा-भाईंदर रोड, हरियास ड्रिम पार्क परिसरात राहतात. सध्याते गोरेगाव येथील बॉक्स ऍण्ड फ्रिट लॉजिस्टिक सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला आहे. ही कंपनी ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक काम करत असून कंपनीचे संपूर्ण भारतातकाम चालते. काही प्रमुख शहरांमध्ये कंपनीच्या शाखा आहेत. नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांच्या कंपनीचे झोनल हेड आणि फुल ट्रक लोडचे प्रमुख देव शर्मा हे कंपनीच्या कामानिमित्त दिल्लीला गेले होते. तिथेच त्यांची मनिषसोबत ओळख झाली होती. मनिष हा दिल्लीतील एका नामांकित कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. ही कंपनीत ट्रकची सेवा पुरविण्याचे काम करत होती. तयानंतर त्यांच्या कंपनीने मनिषच्या कंपनीसोबत करार करुन त्यांची सेवा सुरु केली होती. याच दरम्यान मनिषने त्याच्या परिचित विक्रम जैन याच्याविषयी माहिती दिली होती. विक्रमची मिनरलची कंपनी असून त्याच्या कंपनीचा माल ऑल इंडिया पाठविण्यासाठी त्याल ट्रान्सपोर्ट गाड्याची गरज लागते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीसोबत करार करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
राजस्थानच्या जयपूर शहरात त्यांच्यात एक मिटींग झाली होती. त्यात विक्रम जैन, मनिष आणि देव शर्मा हे उपस्थित होते. त्यांच्यात ट्रान्सपोर्ट सर्व्हिसबाबत सविस्तर चर्चा झाली होती. सर्व अटी आणि नियम मान्य केल्यानंतर त्यांचे विक्रम जैनच्या कंपनीसोबत एक करार झाला होता. या करारात विक्रम जैन यांच्या मालाची संपूर्ण भारतात डिलीव्हरीचे काम त्यांच्या कंपनीला देण्यात आले होते. मालाची डिलीव्हरी केल्यानंतर त्याच्याकडून कंपनीला तीस दिवसांत पेमेंट देण्याचे ठरले होते. मालाची डिलीव्हरीसाठी विक्रम जैन हा आधीच कॉल करुन त्याची माहित देत होता. त्यानंतर कंपनीकडून त्याला ट्रान्सपोर्ट सर्व्हिस दिली जात होती.
जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत त्यांच्या कंपनीने विक्रम जैनच्या गोविंद मिनरल्स कंपनीकडून मिळालेल्या ऑर्डरची डिलीव्हरी विजयवाडा, गुजरातच्या मोरबी, सिल्वासा शहरात केली होती. त्याचे त्यांना ४ कोटी ४४ लाख १८ हजार रुपये पेमेंट येणे बाकी होते. कंपनीकडून पेमेंट न आल्याने त्यांच्याशी त्यांनी पुढील व्यवहार काही दिवसांसाठी बंद केला होता. तसेच कंपनीकडून पेमेंटविषयी सतत विचारणा केली जात होती. मात्र त्यांच्याकडून ४ कोटी ४४ लाखांचे पेमेंट आले नाही. त्यामुळे कंपनीचे सेल्स विभागाचे उपाध्याक्ष व्यकंट नायडू हे स्वतला राजस्थानच्या गोविंद मिनरल्स कंपनीत गेले होते. विक्रम जैनशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्यांना सहा पोस्ट डेटेट चेक दिले होते. मात्र ते सर्व धनादेश बँक न वटता परत आले होते. त्यामुळे कंपनीने ज्या ज्या ठिकाणी मालाची डिलीव्हरी केली होती, तिथे चौकशी केली सुरु केली होती.
या चौकशीदरम्यान त्यांनी विक्रम जैनच्या कंपनीसोबत कोणताही आर्थिक व्यवहार केला नसल्याचे सांगितले. कंपनीचे अधिकारी देव शर्मा, विक्रम जैन आणि मनिष यांनी कट रचून त्यांच्या कंपनीसोबत बोगस करार करुन कंपनीची ४ कोटी ४४ लाखांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने प्रशांत शेट्टीकर यांनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून कंपनीची आर्थिक फसणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.