मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – कामावरुन मानसिक शोषणासह धमकीला कंटाळून एका २२ वर्षांच्या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. चंद्रेशकुमार घनशाम तिवारी असे या तरुणाचे नाव असून त्याच्या आत्महत्येप्रकरणी हॅथवे साईस्टार कंपनीचे मालक सदानंद कदम, मॅनेजर परेश शेट्टी आणि दिपक विश्वकर्मा या तिघांविरुद्घ कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई होणार आहे.
पवन घनशाम तिवारी हा मूळचा उत्तरप्रदेशच्या जौधपूरचा रहिवाशी असून सध्या मालाड येथील शिवाजीनगर, प्रतापनगरच्या बैजू मुकादम चाळीत राहतो. मृत चंद्रेशकुमार हा त्याचा लहान भाऊ असून तो सध्या हॅथवे साईस्टार कंपनीत सिनिअर सेल एक्सुक्ट्युटिव्ह या पदावर काम करत होता. त्यापूर्वी चंद्रेशकुमार हा कांदिवलीतील ठाकूर व्हिलेजच्या टाटा प्ले कंपनीत काम करत होता. ही नोकरी सोडून तो हॅथवे साईस्टारमध्ये कामाला लागला होता. या ठिकाणी कामावर लागल्यानंतर त्याला दिपक विश्वकर्मा, सदानंद कदम आणि परेश शेट्टी हे मानसिक त्रास देत होते. त्याला तिथेच काय तर कुठेच काम करु देणार नाही अशी धमकी देत होते. या धमकीमुळे तो प्रचंड मानसिक तणावात आला होता. याच दरम्यान त्याचा मोठा भाऊ पवन आणि आई सुमन तिवारी हे त्यांच्या उत्तरप्रदेशातील गावी घराच्या कामानिमित्त गेले होते. यावेळी चंद्रेशकुमार हा एकटाच घरी होता. मात्र गावी असताना तो त्यांच्या नियमित संपर्कात होता. २९ ऑक्टोंबरला त्याला कॉल केल्यानंतर त्याने त्याची प्रकृती ठिक नसल्याने दोन दिवस सुट्टी घेतल्याचे सांगितले होते.
३० ऑक्टोंबरला दुपारी पवनने त्याला कॉल केला, मात्र वारंवार कॉल करुनही त्याने कॉल घेतला नाही. त्यामुळे पवनने त्याचा मामा संतोष शुक्लाला कॉल करुन घरी जाऊन पाहणी करण्यास सांगितले. त्यामुळे संतोष शुक्ला तिथे गेले होते. यावेळी त्याने चंद्रेशकुमारला आवाज दिला, मात्र आतून कोणीच प्रतिसाद दिला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने जाळीतून घराचा मुख्य दरवाजा काठीच्या सहाय्याने उघडला. आतमध्े गेल्यानंतर त्याला चंद्रेशकुमारने घरातील छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही माहिती नंतर कुरार पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी चंद्रेशकुमारला तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती नंतर पोलिसांकडून पवन आणि त्याची आई सुमन यांना देण्यात आली. या माहितीनंतर ते दोघेही उत्तरप्रदेशातून मुंबईत येण्यासाठी निघाले होते.
मुंबईत आल्यानंतर त्यांचा मावशी मुलगा प्रतिक तिवारी ऊर्फ शिवम याने सोशल मिडीयावर चंद्रेशकुमारचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे सांगितले. त्यात चंद्रेशकुमारने दिपक विश्वकर्मा, सदानंद कदम आणि परेश शेट्टी यांच्याकडून सुरु असलेल्या मानसिक शोषणासह धमकीला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. हा व्हिडीओ नंतर कुरार पोलिसांना देऊन पवन तिवारीने तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीत त्याने त्यांच्या मानसिक शोषणासह धमकीला कंटाळून चंद्रेशकुमारने आत्महत्या केल्याचा आरेाप केला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी हॅथवे केबलचे मालक सदानंद कदम, मॅनेजर परेश शेट्टी आणि दिपक विश्कर्मा याच्याविरुद्घ आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.