योगी आदित्यनाथ यांना पुन्हा जिवे मारण्याच्या धमकीचा मॅसेज
बाबा सिद्धीकीसारखी हत्या झाल्यास हमास-इस्त्राईलसारखी अवस्था होईल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शनिवारी एका मॅसेजद्वारे जिवे मारण्याच्या धमकीचा मॅसेज आल्याची घटना ताजी असताना रविवारी रात्री पुन्हा एका अज्ञात व्यक्तीने त्यांना जिवे मारण्याच्या धमकीचा दुसरा मॅसेज पाठविल्याने एकच खळबळ उडाली आहे. योगी आदित्यनाथ यांची बाबा सिद्धीकी यांच्यासारखी हत्या झाल्यास जगाच्या नकाशावर भारताची अवस्था हमास आणि इस्त्राईलसारखी होईल असे धमकीच्या मॅसेजमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान या धमकीनंतर वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. धमकी देणार्या व्यक्तीच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसने संमातर तपास सुरु केला आहे.
शनिवारी वरळीतील वाहतूक विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज पाठविला होता. त्यात योगी आदित्यनाथ यांनी दहा दिवसांत राजीनामा दिला नाहीतर त्यांचा बाबा सिद्धीकी करु अशी धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. हा तपास सुरु असताना मुंबई युनिटच्या एटीएसने उल्हासनगर येथून एका २४ वर्षांच्या तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या चौकशीत तिनेच वाहतूक विभागाच्या हेल्पलाईन मोबाईल क्रमांकावर हा मॅसेज पाठविल्याचे तपासात उघडकीस आले होते. ही तरुणी उच्चशिक्षित असून तिने बीएससीचे पदवी घेतली आहे. सध्या ती मानसिक आजाराने त्रास्त असून याच नैराश्यातून तिने हा धमकीचा मॅसेज पाठविला होता. प्रकृती ठिक नसल्याने तिची चौकशी करुन तिला तिच्या पालकांकडे सोपविण्यात आले होते.
ही घटना ताजी असताना रविवारी रात्री नऊ वाजता अशाच एक मॅसेज वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर पोलिसांना प्राप्त झाला. त्यात अगर बाबा योगी का मौत बाबा सिद्धीकी के जैसा हुआ तो इस पृथ्वी पर भारत का नक्शा हमास और इजरायल के तरह ही दिखाई देगा असा मजकूर लिहिला होता. सलग दुसर्या दिवशी योगी आदित्यनाथ यांच्या नावाने धमकी आल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली होती. या धमकीनंतर वरळी पोलिसांनी धमकी दिल्याप्रकरणी दुसर्या गुन्ह्यांची नोंद केली आहे.
गेल्या महिन्यांत वांद्रे येथे बाबा सिद्धीकी यांची तीन व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. याच हत्येच्या गुन्ह्यांत पोलिसांनी पंधरा आरोपींना अटक केली होती. त्यातच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईसह इतर ठिकाणी सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर योगी यांना आलेल्या धमकीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली होती. त्यामुळे या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसकडून संमातर तपास सुरु आहे.