शिवडी येथे ३८ वर्षांच्या व्यक्तीची मारहाण करुन हत्या
हत्येचा गुन्हा दाखल होताच मारेकर्याला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – शिवडी येथे सुरज रामबहादूर थापा या ३८ वर्षांच्या व्यक्तीची लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली. याप्रकरणी रफि अहमद किडवाई पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून मोहम्मद हाफिज खान या आरोपीस अटक केली. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या हत्येमागील कारण समजू शकले नाही. आरोपीच्या चौकशीतून हत्येमागील कारणाचा खुलासा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना शुक्रवारी १ नोव्हेंबरला रात्री दहा वाजता शिवडी येथील प्रबोधनकार ठाकरे मार्ग, लाला ऑटो स्टोअरसमोरील विना-बिना अपार्टमेंटजवळ घडली. सुरज थापा हा शिवडीतील टी. जे रोड, तांबोळी पत्रा चाळीतील रहिवाशी आहे. १ नोव्हेंबरला विना-बिना इमारतीजवळ एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडला असून त्याला पोलीस मदतीची गरज आहे असा कॉल मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आला होता. ही माहिती प्राप्त होताच आरएके मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी जखमी अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला पोलिसांनी तातडीने जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला होता. त्याचा अहवाल नंतर पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यात मृत व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यात त्याच्या छातीला, डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली होती. अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते.
या अहवालानंतर पोलीस उपनिरीक्षक योगेश खरात यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सोमवारी ४ नोव्हेंबरला अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. चौकशीदरम्यान मृत व्यक्तीची ओळख पटली होती. सुरज थापा असे या व्यक्तीचे नाव असून तो शिवडी परिसरात राहत होता. त्याच्यासोबत आई-बहिणीला तिथे उपस्थित होते, त्यामुळे या दोघींची पोलिसांनी जबानी नोंदविली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मोहम्मद हाफिज खान याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने क्षुल्लक कारणावरुन सुरज थापाला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत तो बेशुद्ध झाला आणि उपचार मिळविण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी मोहम्मद हाफिजला हत्येच्या गुन्ह्यांत अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून हत्येमागील कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.