दागिन्यांचे स्केच काढून कमिशनच्या आमिषाने फसवणुक
मैत्रिणीचे १८ लाखांचे सोन्याचे दागिने आरोपी मित्राचे पलायन
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – सोन्याच्या दागिन्यांचे स्केच काढून त्यामोबदल्यात चांगले कमिशन देण्याचे आमिष दाखवून एका ४० वर्षांच्या महिलेचे सुमारे १८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन तिच्याच मित्राने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भौतिक रमेश शहा या आरेापी मित्राविरुद्ध कांदिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. सोशल मिडीयावरुन ओळख झालेल्या मित्राला विश्वासाने स्वतचे अठरा लाखांचे दागिने देणे तक्रारदार महिलेला चांगलेच महागात पडले आहे.
४० वर्षांची तक्रारदार महिला ही कांदिवली परिसरात राहते. सप्टेंबर महिन्यांत तिची इंटाग्रामवर भौतिक शहाशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. ते दोघेही सोशल मिडीयासह मोबाईलवर एकमेकांच्या संपर्कात होते. यावेळी त्याने त्याचा स्वतचा सोन्याच्या दागिन्यांचा व्यवसाय असल्याचे सांगितले होते. त्याने तिच्याकडील सोन्याचे दागिन्यांचे स्केच काढून त्यामोबदल्यात तिला चांगले कमिशन देतो असे सांगून तिचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे ती तिचे सुमारे अठरा लाखांचे विविध सोन्याचे दागिने घेऊन कांदिवलीतील एस. व्ही रोड, अदानी इलेक्टिसिटीसमोरील ब्युटी शॉपसमोर आली होती. १९ सप्टेंबरला झालेल्या भेटीदरम्यान तिने त्याला विश्वासाने तिचे सर्व दागिने दिले होते. काही दिवसांनी ते दागिने परत देतो असे सांगून भौतिक शहा हा निघून गेला होता. मात्र दहा ते पंधरा दिवस उलटूनही त्याने दागिने परत केले नाही. त्यामुळे तिने त्याला कॉल केला, मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. वारंवार कॉल करुनही तो तिला प्रतिसाद देत नव्हता. तिचे दागिने परत करत नव्हता.
भौतिक अठरा लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पळून गेल्याची खात्री होताच तिने घडलेला प्रकार कांदिवली पोलिसांना सांगून भौतिक शहाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन तक्रारदार महिलेची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपी मित्राच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.