बाबा सिद्धीकी हत्येप्रकरणी पुण्यातून प्रशिक्षकाला अटक
शूटर्संना शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांच्या हत्येत वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस पुण्यातून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. गौरव विलास आपुणे असे या २३ वर्षांच्या आरोपीचे नाव असून त्याने हत्येतील शूटर्संना शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यासाठी त्याला पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, या संपूर्ण कटाची माहिती गौरवला होती. त्यामुळे त्याच्यावर अटकेची कारवाई करुन त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने शनिवार ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी पोलिसांनी पंधरा आरोपींना अटक केली असून गौरव हा या कटात अटक झालेला सोळावा आरोपी आहे.
१२ ऑक्टोंबरला दसर्याच्या दिवशी वांद्रे येथे बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा तपास सध्या खंडणीविरोधी पथकाकडे असून तपास हाती येताच पोलिसांनी आतापर्यंत पंधरा आरोपींना अटक केली आहे. त्यात दोन शूटरचा समावेश असून तिसरा शूटर गोळीबारानंतर पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. या पंधरा आरोपींमघ्ये गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप, प्रविण रामेश्वर लोणकर, हरिशकुमार बालकराम निशाद, नितीन गौतम सप्रे, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, संभाजी किसन पारधी, राम फुलचंद कनोजिया, भगवतसिंग ओमसिंग, अमीत हिसमसिंग कुमार, रुपेश राजेंद्र मोहोळ, करण राहुल साळवे, शिवम अरविंद कोहाड आणि सुजीत सुशील सिंग यांचा समावेश होता. ते सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीत गौरव याचे नाव समोर आले होते. गौरव हा पुण्याचा रहिवाशी असून त्याला या संपूर्ण कटाची माहिती होती. त्याच्यावर शूटरला शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर त्याला काही पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र दोन्ही शूटरसह पंधरा आरोपी पकडले गेल्याने त्याला पैसे मिळाले नाही. शूटर्संना शस्त्रे चालविण्याचे त्याने प्रशिक्षण दिले होते, त्यामुळे त्याच्या मागावर पोलीस असल्याची माहिती त्याला होती. त्यामुळे तो पळून गेला होता. अखेर त्याला एक महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले. पुण्यातून अटक केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर बुधवारी दुपारी त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत बिष्णोई बंधूंसह शिवकुमार गौतम, मोहम्मद जिशान अख्तर आणि शुभम रामेश्वर लोणकर यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.