प्लॉटसाठी घेतलेल्या २२ लाखांचा अपहार करुन फसवणुक
चेंबूर येथील घटना; पती-पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ मार्च २०२४
मुंबई, – रायगड येथील मानगावात असलेला मोकळा प्लॉट स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका ५५ वर्षांच्या महिलेकडून घेतलेल्या सुमारे २२ लाखांचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अरुद्दीन सय्यद कुरुक्कर आणि अर्षिया अरुद्दीन कुरुक्कर या पती-पत्नीविरुद्ध आरसीएफ पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
कांचन मॅक्स थॉमस ही महिला चेंबूर येथे तिच्या दोन मुलांसोबत राहते. तिचे पती मस्कत येथे नोकरीस असून ते वर्षांतून एक-दोन वेळा भारतात येतात. त्यांना एका मोकळ्या प्लॉटमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यामुळे तिने तिच्या पतीच्या परिचित एजंटच्या मदतीने प्लॉटचा शोध सुरु केला होता. यावेळी तिला रायगड येथील मानगावातील रहिवाशी अरुद्दीन कुरुक्कर याच्याकडे काही मोकळे प्लॉट असून तो त्यांना स्वस्तात एक प्लॉट मिळवून देईल असे सांगितले. नोव्हेंबर २०२० रोजी अरुद्दीन हा त्यांच्या घरी आला होता. यावेळी त्याने त्यांना काही प्लॉटचे फोटो दाखविले होते. प्लॉटची जागा आवडल्याने ती तिच्या नातेवाईकांसोबत मानगावात गेली होती. तिथे प्लॉट पाहिल्यानंतर तिने ती जागा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांच्यात जागेचा व्यवहार पक्का झाला होता. त्यामुळे तिने अरुद्दीन व त्याची पत्नी आर्षिया यांच्या बँक खात्यात २५ लाख ५० हजार रुपये ट्रान्स्फर केले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्याने प्लॉटचा ताबा दिला नाही. त्यानंतर त्याने दुसरा प्लॉट देण्याचे मान्य करताना तिला नऊ लाख तीस हजार रुपये परत करण्याचे आश्वासन देत उर्वरित रक्कम प्लॉटसाठी घेणार असल्याचा करार केला. मात्र त्याने दुसरा प्लॉट मिळवून दिला नाही. तसेच त्याने दिलेले सर्व धनादेश बँकेत न वटता परत आले होते. नोव्हेंबर २०२० पासून त्याच्यासह त्याच्या पत्नीने मानगावात प्लॉट मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून २५ लाख ५० हजार रुपये घेतले. त्यापैकी तीन लाख पंधरा हजार रुपये परत केले. उर्वरित २२ लाख ३५ हजाराचा अपहार करुन तिची फसवणुक केली होती. त्यामुळे तिने आरसीएफ पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अरुद्दीन आणि त्याची पत्नी आर्षिया करुक्कर यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. लवकरच आरोपी पती-पत्नीची चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी अशाच प्रकारे प्लॉटच्या नावाने इतर गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.