उसने पैशांची मागणी केली म्हणून ४८ वर्षांची व्यक्तीची हत्या

हत्येच्या गुन्ह्यांत आरोपीसह प्रेयसीला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – उसने घेतलेल्या पैशांची मागणी केली म्हणून झालेल्या वादातून एका ४८ वर्षांच्या व्यक्तीची त्याच्याच परिचित आरोपीसह त्याच्या प्रेयसीने लाथ्याबुक्यांसह ब्लेडने वार करुन हत्या केल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. प्रशांत सुदाम पवार असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी आरोपी तरुणासह त्याच्या प्रेयसीला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. फालदा ऊर्फ सोनी राजेशकुमार पाटील (२०) आणि रितेश ओमप्रकाश चव्हाण (२५) अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही गुरुवारी बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना बुधवारी सायंकाळी सव्वापाच वाजता बोरिवलीतील एस. व्ही रोड, दौलतनगर, सुधीर फडके ब्रिजखाली घडली. प्रशांत पवार हा मााड येथील मोरवे रोड, खारोडी गावचा रहिवाशी आहे. रितेश हा त्याचा मित्र असून काही दिवसांपूर्वी त्याने रितेशला उसने पैसे दिले होते. मात्र वारंवार पैशांची मागणी करुनही तो त्याला उसने पैसे देत नव्हता. बुधवारी सायंकाळी रितेश हा सोनीसोबत सुधीर फडके ब्रिजखाली गप्पा मारत होता. यावेळी तिथे प्रशांत पवार तिथे आला आणि त्याने रितेशकडे पैशांची मागणी केली होती. यावेळी त्यांच्यात पैशांवरुन प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. रागाच्या भरात रितेशने त्याला पैसे देणार नाही. तुला जे काय करायचे आहे ते कर असे सांगितले. त्यातून त्यांच्यातील वाद विकोपास गेला होता. याच रागातून रितेश आणि सोनी यांनी प्रशांतला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर या दोघांनी त्याच्या गळ्यावर ब्लेडने वार केले होते. त्यात प्रशांत हा गंभीररीत्या जखमी झाला होता. या हल्ल्यानंतर ते दोघेही पळून गेले होते.

ही माहिती मिळताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या प्रशांतला तातडीने जवळच्या कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. याप्रकरणी प्रशांतचा भाऊ गणेश सुदाम पवार यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनीी रितेश चव्हाण आणि त्याची प्रेयसी सोनी पाटील या दोघांनाही ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी घडलेला प्रकार सांगून त्यांनी प्रशांतची आर्थिक वादातून लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन ब्लेडने वार केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोघांनाही गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page