उपचाराच्या नावाने वयोवृद्ध महिलेची सात लाखांची फसवणुक
तीन वर्षांनंतर दोन्ही ठगाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – गुडघे दुखीच्या आजारावर थातूरमातूर उपचार करुन एका वयोवृद्ध महिलेची सात लाख वीस हजार रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी दोन ठगाविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनोद गोयल आणि डॉ. जाफरभाई मर्चंट अशी या दोघांची नावे आहेत. तीन वर्षांपूर्वी हा प्रकार घडला होता, एका वर्तमानपत्रात अशाच प्रकारच्या फसवणुकीचा प्रकार वाचण्यात आल्याने वयोवृद्ध महिलेच्या मुलीने पोलिसांत केल्याचे सांगण्यात आले. पळून गेलेल्या दोन्ही ठगांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
रश्मी मनमोहन चोप्रा ही ६१ वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार महिला अंधेरी परिसरात राहते. २२ ऑक्टोंबर २०२१ रोजी तिची आई मधुलिना सच्चर ही अंधेरीतील चार बंगला परिसरातील एका दाताच्या क्लिनिकमध्ये गेली होती. यावेळी तिची विनोद गोयल या व्यक्तीशी ओळख झाली होती. त्याने तिला गुडघे दुखीचा त्रास आहे का अशी विचारणा करुन त्याच्या आईलाही असा त्रास होता. त्याच्या परिचित मित्र असून तो घरी येऊन गुडघे दुखीवर उपचार करतो. त्याच्या उपचारामुळे आतापर्यंत अनेकांना फायदा झाला आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्याकडून गुडघे दुखीवर उपचार करुन घ्या असा सल्ला दिला. यावेळी त्याने त्याने तिला वाशीचा रहिवाशी असलेल्या डॉ. जाफरभाई मर्चंटचा मोबाईल क्रमांक दिला. घरी गेल्यानंतर तिने जाफरभाईला फोन करुन तिच्या गुडघे दुखीबाबत सांगितले. यावेळी त्याने तिच्या घरी येऊन तपासणी करुन उपचार करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी साडेनऊ वाजता तिच्या घरी जाफरभाई आला होता. त्याने तिच्या गुडघे दुखीची पाहणी करुन दोन्ही गुडघ्यातून रक्त काढले. एका पेपरवर रक्ताचे नमून घेऊन त्याने हळद लावून सदरचे पेपर फेंकून दिले. तिला आता गुडघे दुखीचा त्रास होणार नाही असे सांगून त्याने तिच्याकडे उपचाराचे सात लाख वीस हजार रुपये मागितले. मात्र तिने तिच्याकडे इतके पैसे नसल्याचे सांगितले. यावेळी तिने मुलीशी बोलून त्याला ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करते असे सांगितले. त्यानंतर तिने तिच्या नातेवाईकाकडून पैसे घेऊन त्याला सात लाख वीस हजार रुपये ट्रान्स्फर केले होते.
दुसर्या दिवशी त्याने तिला कॉल करुन तिच्या गुडघे दुखीबाबत विचारणा केली. यावेळी तिने तिला काही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले. त्याच्या चुकीच्या उपचारामुळे तिची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तिने त्याला कॉल केला असता त्याने तो बंगलोरला असल्याचे सांगून तिला टाळण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. त्यामुळे तिने विनोद गोयलकडे विचारणा केली असता त्याने तिला त्याचा मानपाड्याचा पत्ता सांगितला. मात्र जाफरभाईला वारंवार कॉल करुनही त्याने प्रतिसाद दिला नाही. गेल्या तीन वर्षांपासून विनोद आणि जाफरभाईंचा फोन बंद येत होता. याच दरम्यान रश्मी चोप्राच्या सासू आणि सासर्यांची प्रकृती बिघडल्याने तिला पोलिसांत तक्रार करता आली नवहती. ऑगस्ट २०२४ रोजी तिला अशाच प्रकारच्या एका फसवणुकीची बातमी वाचण्यात आली होती. त्यामुळे तिने ओशिवरा पोलिसांना तीन वर्षांपूर्वी घडलेला प्रकार सांगून संबंधित दोन्ही ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विनोद गोयल आणि जाफरभाई मर्चंट या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्यांच्या मोबाईल क्रमांकावरुन दोन्ही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही एक सराईत टोळी असून या टोळीने आतापर्यंत अनेकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते.