व्यावसायिकाच्या घरी चोरी करणार्या केअरटेकरला अटक
साडेअकरा लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, (प्रतिनिधी) – कांदिवलीतील एका कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाच घरी चोरी करुन पळून गेलेल्या केअरटेकरला कांदिवली पोलिसांनी अटक केली. अरविंद शंभू तिवारी असे या आरोपी केअरटेकरचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रशांत प्रतापशी मटाणी हे कांदिवलील महावीरनगर परिसरात राहत असून त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्यांचे ९० वर्षाचे वयोवृद्ध वडिल प्रतापशी हे आजारी असल्याने त्यांच्यावर अरिहंत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारानंतर त्यांना डॉक्टरच्या सल्ल्याने घरी पाठविण्यात आले होते. त्यांची देखभाल करण्यासाठी त्यांनी अरविंद तिवारीला त्यांच्या घरी केअरटेकर म्हणून ठेवले होते. जून २०२४ पासून तो त्यांच्याकडे सकाळी आठ ते सायंकाळी सात या कालावधीत काम करत होता.
९ ऑक्टोंबर ते १६ ऑक्टोंबर या कालावधीत तो त्याच्या भावाची प्रकृती ठिक नसल्याने सुट्टी घेऊन त्याच्या गावी गेला होता. त्यानंतर त्यांनी त्याच्या जागी राजेंद्र रावत याला केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते. १ नोव्हेंबरला ते त्यांच्या कपाटातून टिसोट कंपनीचे घड्याळ काढत होते. यावेळी त्यांना ते घड्याळ तसेच कपाटातील सोन्याचे, हिरेजडीत दागिने आणि २५ हजार रुपयांची कॅश असा सुमारे साडेअकरा लाखांचा मुद्देमाल दिसून आला नाही. त्यांनी सर्वत्र कपाटात दागिन्यांसह कॅशचा शोध घेतला, मात्र त्यांना कुठेच दागिने सापडले नाही. त्यामुळे त्यांनी घरातील सर्वांना विचारणा केली होती, मात्र कोणालाही दागिन्यासह कॅशबाबत काहीच माहित नव्हते. अरविंद काम सोडून गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे त्यानेच ही चोरी करुन पलायन केले असावे असा संशय व्यक्त करुन त्यांनी अरविंदविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर अरविंदविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अरविंदला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.