मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ मार्च २०२४
मुंबई, – हिमाचल प्रदेशातून आलेल्या चरससह सागर देवीदास राणा या ३५ वर्षांच्या आरोपीस वर्सोवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी बारा लाख रुपयांचा दोन किलो चरससह दोन मोबाईल जप्त केले आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी होत असल्याने वरिष्ठांनी सर्वच पोलीस ठाण्यांना ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी अशा तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. शनिवारी रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमीत जाधव, श्रीकांत निचळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, पोलीस हवालदार खोंडगे, वाडेकर, पोलीस शिपाई खैरनार, पठाण आदी पथक परिसरात गस्त घालत होते. अंधेरीतील अत्युतराव पटवर्धन मार्ग, चार बंगला, ज्ञानकेंद्र स्कूलसमोर गस्त घालणार्या पोलीस पथकाला एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. पोलिसांना पाहताच तो पळू लागला.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना दोन किलो चरसचा साठा सापडला. त्याची किंमत सुमारे बारा लाख रुपये आहे. या चरससह दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले होते. चौकशीत सागर राणा हा हिमाचलप्रदेशातील कुल्लूमनाली, जेरी बगिंदा गावचा रहिवाशी असून तो एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. मुंबई शहरात चरसचा प्रचंड मागणी असल्याने तो चरस घेऊन मुंबईत विक्रीसाठी आला होता. मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविला असून याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील सुट्टीकालिन न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्याला ते चरस कोणी दिले, तो चरस कोणाला विक्रीसाठी आला होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्याने यापूर्वीही ड्रग्जची विक्री केली आहे का याचा आता पोलीस तपास करत आहेत. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला, मात्र अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.