मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – उत्तराखंड येथून आणलेल्या हेरॉईनसह चारजणांच्या एका टोळीला कांदिवली युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. अटक आरोपींमध्ये एकजण उत्तरप्रदेश तर इतर तिघेही उत्तराखंडचे रहिवाशी आहे. मुंबई शहरात हेरॉईनला प्रचंड मागणी असल्याने त्याची विक्रीसाठी ते चौघेही मुंबईत आले होते. मात्र हेरॉईनची विक्री करण्यापूर्वीच या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून विविध ड्रग्ज आणून त्याची मुंबई शहरात विक्रीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच मालाडच्या मालवणी परिसरात काहीजण हेरॉईन घेऊन येणार असल्याची माहिती कांदिवली युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात गस्त सुरु केली होती. यावेळी मावणी परिसरात चारजण संशयास्पद फिरताना दिसले. त्यांना पोलिसांनी हटकले असता ते चौघेही पोलिसांना पाहून पळू लागले. यावेळी पोलिसांनी पाठलाग करुन पळून जाणार्या चारही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना ५९४ ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे हेरॉईन सापडले. या हेरॉईनची किंमत २ कोटी ३७ लाख ६० हजार रुपये इतकी आहे.
चौकशीत ते चौघेही उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. त्यांनी ते ड्रग्ज उत्तराखंड येथून मुंबई शहरात विक्रीसाठी आणला होता. त्यासाठी ते चौघेही मालाडच्या मालवणी परिसरात आले होते. मात्र हेरॉईनची खरेदी-विक्री होण्यापूर्वीच या चौघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौघांना ते हेरॉईन कोणी दिले होते, मुंबईत हेरॉईनची ते कोणाला विक्री करणार होते. त्यांनी यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
२०२४ साली हेरॉईन तस्करीप्रकरणी ऍण्टी नारकोटीक्स सेलचे ६८ गुन्ह्यांची नोंद केली असून याच गुन्ह्यांत आतापर्यंत १४६ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी ३०१० ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले आहे. त्याची किंमत ५३ कोटी ६५ लाख रुपये इतकी आहे. इतर सहा गुन्ह्यांत पोलिसांनी अठरा आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून सर्वाधिक ८ कोटी ८८ लाख रुपयांचा हेरॉईनचचा साठा जप्त केला होता.