महिलेवर तिच्याच अल्पवयीन मुलाकडून प्राणघातक हल्ला
गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याने महिला गंभीर जखमी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – क्षुल्लक कारणावरुन एका ३० वर्षांच्या महिलेवर तिच्याच अल्पवयीन मुलाने प्राणघातक हल्ला केला. संगीता ऋषी सिंग असे या महिलेचे नाव असून तिच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली होती. तिच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिची प्रकृती सुधारत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चुन्नाभट्टी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पंधरा वर्षांच्या आरोपी मुलाला ताब्यात घेतले होते. त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी सव्वाअकरा वाजता चुन्नाभट्टी येथील चाफेगल्ली, स्वदेशी मिल रोड परिसरात घडली. सुप्रिया बाळासाहेब जाधव या महिला महिला पोलीस शिपाई असून सध्या चुन्नाभट्टी परिसरात कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी सव्वाअकरा वाजता त्या चुन्नाभट्टी येथील चाफेगल्ली परिसरात बंदोबस्तावर होते. याच दरम्यान तिथे एक व्यक्ती आला आणि त्याने एका महिलेवर तिच्याच अल्पवयीन मुलाने तिक्ष्ण हत्याराने वार केले आहे. तिला पोलीस मदतीची गरज आहे असे सांगितले. त्यामुळे सुप्रिया जाधव यांनी ही माहिती त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांना देऊन घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी स्वदेशी मिल रोड, रुम क्रमांक ५८/२ मध्ये संगीता सिंग ही महिला गंभीररीत्या जखमी झाल्याचे दिसून आली. तिच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. त्यामुळे तिला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.
तिची दुखापत गंभीर असल्याने ती बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. मात्र तिने इशार्याने हा हल्ला तिच्या मुलाने केल्याचे सांगितले. त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या रागातून त्याने त्याची आई संगीताच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन तेथून पलायन केले होते. तपासात हा प्रकार उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो अल्पवयीन असल्याने त्याला नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.