दारुच्या नशेत पत्नीला मारहाण करणार्‍या भावाची हत्या

हत्येनंतर पित्यासह भावाचे पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० नोव्हेंबर २०२४
मुंबई, – दारुच्या नशेत शिवीगाळ करुन पत्नीला मारहाण करणार्‍या भावाची त्याच्या पित्यासह लहान भावाने क्रिकेटच्या बॅटने मारहाण करुन हत्या केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. हत्येनंतर आरोपी पित्यासह भावाने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते. मारुती गोविंदा सूर्यवंशी आणि नितीन मारुती सूर्यंवंशी अशी या दोघांची नावे असून त्यांच्यावर निलेश मारुती सूर्यवंशी याची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता अंधेरीतील सुभाषनगर, गल्ली क्रमांक दोन, हरहर महादेव चाळीत घडली. याच चाळीत सूर्यवंशी कुटुंबिय राहतात. ६५ वर्षांचे मारुती सूर्यवंशी यांचा निलेश मोठा तर नितीन लहान मुलगा आहे. ते बिगारी काम तर निलेश हा खाजगी कंपनीत कामाला आहे. मृत निलेश हा काहीच कामधंदा करत नव्हता. त्याला नशा करण्याचे व्यसन होते. दररोज नशा करुन घरी आल्यानंतर तो घरी शिवीगाळ करुन इतर सदस्यांना त्रास देत होता. त्याच्या पत्नीला मारहाण करत होता. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता तो नेहमीप्रमाणे नशा करुन घरी आला होता. घरी आल्यानंतर त्याने पुन्हा घरात गोंधळ घालून त्याच्या पत्नीला शिवीगाळ करुन मारहाण करु लागला. यावेळी मारुती आणि नितीनने त्याला जाब विचारणा केला होता. त्यातून त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. दररोजच्या शिवीगाळ आणि मारहाणीला कंटाळून रागाच्या भरात या दोघांनी निलेशला क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण केली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता.

या घटनेनंतर ते दोघेही एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेले अणि त्यांनी घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या निलेशला पोलिसांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस हवालदार महेंद्र मधुकर सारदळ यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मारुती सूर्यवंशी आणि त्यांचा मुलगा नितीन सूर्यवंशी यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत दोघांनाही शनिवारी दुपारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page