बाबा सिद्धीकी हत्येतील मुख्य शूटरसह पाचजणांना कोठडी
विमानातून मुंबईत आणून मेडीकलनंतर थेट कोर्टात हजर केले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – ऑक्टोंबर महिन्यांत झालेल्या माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळ्या झाडणार्या मुख्य शूटरसह त्याच्या चार सहकार्यांना पुढील चौकशीसाठी उत्तरप्रदेशातून मुंबईत आणण्यात आले आहे. विमानातून मुंबईत आणल्यानंतर या पाचही आरोपींची मेडीकल करण्यात आली आणि नंतर त्यांना थेट किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने पाचही आरोपींना मंगळवार १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा बालकिशन गौतम या मुख्य शूटरसह त्याचे चार सहकारी अनुराग राधेश्याम कश्यप, ज्ञानप्रकाश प्रदीपकुमार त्रिपाठी, आकाश बृजकुमार श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रतापसिंह सुरेशसिंह यांचा समावेश आहे. यावेळी पोलिसांनी तिन्ही शूटरने बाबा सिद्धीकी यांच्या घरासह कार्यालयाची जवळपास एक महिना रेकी केल्याचा दावा कोर्टात केला होता. शिवकुमार हा तिसरा शूटर असल्याने त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
गेल्या महिन्यांत बाबा सिद्धीकी यांची वांद्रे येथे तीन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर पळून जाणार्या तीनपैकी दोन शूटरसह अठरा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींच्या अटकेने या हत्येमागे पुणे आणि उत्तरप्रदेश कनेक्शन उघडकीस आले होते. तिसरा शूटर शिवकुमार हा हल्ल्यानंतर पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न सुरु केले होते. ही मोहीम सुरु असताना शिवकुमार हा उत्तरप्रदेशातून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तिथे २५ दिवस तळ ठोकून बसले होते. या पथकाने जातीय हिंसाचाराचा सामना करताना अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांचा तपास सुरु ठेवला होता. अखेर या पथकाला शिवकुमारच्या ठावठिकाणाची माहिती मिळाली होती. यावेळी त्यांच्या मदतीसाठी गुन्हे शाखेच्या जवळपास २१ हून अधिक अधिकारी आणि कर्मचार्यांना पाठविण्यात आले होते. या पथकाने उत्तरप्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने बहराईच परिसरातून शिवकुमारसह त्याच्या इतर चार सहकार्यांना शिताफीने अटक केली होती.
त्यांच्या चौकशीत त्यांनी शिवकुमार हा नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली होती. अटकेनंतर या पाचही आरोपींना सोमवारी विमानातून मुंबईत आणण्यात आले होते. या सर्वांना विमानतळावरुन मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सर्व आरोपींना न्यायालयाने १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आरोपींना पोलीस बंदोबस्तात पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार करणारा शिवकुमार पहिला आरोपी होता. १२ ऑक्टोंबरला बाबा सिद्धीकी हे त्यांचा आमदार पूत्र झिशान सिद्धीकी यांच्या कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते. काही अंतर गेल्यानंतर त्यांनी बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार करण्याची तयारी केली होती, मात्र ऐन वेळेस शिवकुमारने अचानक गोळीबार केला होता. त्यामुळे इतर दोघांनीही त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील एक गोळी छातीला लागल्याने बाबा सिद्धीकी यांचा मृत्यू झाला होता.
गोळीबारानंतर गुरमेल सिंग ाणि धर्मराज कश्यप पकडले गेले. मात्र शिवकुमार हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मुंबई-पुणे-झांसी-लखनऊ असा प्रवास करुन तो बेहराईचला गेला होता. तेथून तो नेपाळला कायमचा पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र नेपाळला जाण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला नेपाळला जाण्यासाठी इतर चौघांनी मदत केली होती, त्यामुळे या चौघांनाही अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. या सर्वांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.