अपहरणासह हत्येच्या गुन्ह्यांतील बिहारी आरोपीस अटक
सोळा वर्षांच्या मुलाचे अपहरण करुन हत्या केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – अपहणासह हत्येच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका २२ वर्षांच्या बिहारी आरोपीला भायखळा पोलिसांनी अटक केली. शाहिद राजा ऊर्फ राजू नसीम खान असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर सहा दिवसांपूर्वी बिहार राज्यात मोहम्मद आलम रहुफ खान या सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. अटकेच्या भीतीने तो हत्येनंतर बिहारहून मुंबईत पळून आला होता, मात्र त्याला भायखळा पोलिसांनी शिताफीने अटक करुन पुढील चौकशीसाठी अकबरनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. शाहिद हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अशाच अन्य एका गुन्ह्यांची नोंद होती. जामिनावर बाहेर आलेल्या शाहिदने पुन्हा एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुस्तकीन रहुफ खान हा बिहारच्या भागलपूर, इंग्लिश चिचरोनची रहिवाशी आहे. मोहम्मद आलम हा त्याचा लहान भाऊ आहे. ५ नोव्हेंबरला त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. अपहरणानंतर त्याची अत्यंत निर्घृणरीत्या हत्या करण्यात आली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भागलपूरच्या अकबरनगर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकर्याविरुद्ध अपहरणासह हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यांत शाहिद राजा याचे नाव समोर आले होते. तो तक्रारदाराच्या राहत्या परिसरात राहत होता. अपहरणासह हत्येच्या घटनेनंतर तो पळून गेला होता. अटकेच्या भीतीने तो बिहारहून मुंबईत पळून गेला होता. ही माहिती बिहार पोलिसांकडून प्राप्त होताच भायखळा पोलिसांनी शाहिदचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना शाहिद हा डोंगरीतील सरदार वल्लभभाई पटेल रोड, सिटी मून हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने सिटी मून हॉटेलमध्ये छापा टाकून शाहिद राजा याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने मोहम्मद आलम या अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन नंतर त्याची हत्या केल्याची कबुली होती. त्याच्या अटकेची माहिती नंतर अकबरनगर पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर संबंधित पोलीस पथक त्याचा ताबा घेण्यासाठी मुंबईत आले होते. अटकेनंतर शाहिदला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याने तीन दिवसांची ट्रॉन्झिंट रिमांड दिले होते. त्यानंतर त्याचा ताबा घेऊन अकबरनगर पोलीस बिहारला निघून गेले. तपासात शाहिदने २०२२ साली अशाच प्रकारे एका व्यक्तीचे अपहरण करुन त्याची हत्या केली होती. हत्येनंतर पुरावा नष्ट करुन तो पळून गेला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. काही महिने जेलमध्ये राहिल्यानंतर त्याला कोर्टाने जामिन मंजूर केला होता. याच गुन्ह्यांत जामिनावर असताना त्याने ५ नोव्हेंबरला मोहम्मद आलम या मुलाचे अपहरण करुन नंतर त्याची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर चिंदरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे, पोलीस निरीक्षक जितेश शिंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास माने, पोलीस हवालदार पठारे, संजय जाधव, देशमुख, राकेश कदम, पोलीस शिपाई दिगंबर साताळकर, राजेश राठोड, राकेश जाधव, सोमनाथ जगताप, जालिंदर पिचड, सोनावणे, देसाई, राजेश पाटील यांनी केली.