व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी व्यापार्याला अटक
सवलतीमध्ये सोने देण्याची बतावणी करुन २२ लाखांना गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – पुण्यातील बांधकाम क्षेत्राशी संबंधित एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी अमीत रुपलाल जैन या ज्वेलर्स व्यापार्याला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. सवलतीमध्ये सोने देण्याची बतावणी करुन अमीत जैन व त्याच्या सहकार्यांनी तक्रारदार व्यापार्याची सुमारे २२ लाखांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आहे. या गुन्ह्यांत हितेश सोलंकी व इतर आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने अशा प्रकारे अन्य काही गुन्हे केल्याचे बोलले जात असून अटक आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अशाच काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
५६ वर्षांचे सलीम वजीर पठाण हे मूळचे पुण्यातील चिखलीचे रहिवाशी आहे. त्यांचा बांधकामाशी संबंधित व्यवसाय आहे. मार्च २०२४ त्यांची दामिनी शहा या महिलेशी ओळख झाली होती. तिचे अंधेरी येथे एक कार्यालय असून तिने त्यांना चार टक्के सवलतीमध्ये सोने खरेदीची एक योजना सांगिली होती. यासंदर्भात त्यांचे तिच्याशी बोलणे सुरु होते. ६ ऑक्टोंबरला ते दामिनीला भेटण्यासाठी पुण्यातून मुंबईत आले होते. यावेळी त्यांची विलेपार्ले येथील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. या हॉटेलमध्ये तिने त्यांची ओळख अमीत जैन आणि हितेश सोलंकी यांच्याशी करुन दिली होती. अमीत हा ज्वेलर्स व्यापारी असून त्याचे विलेपार्ले येथील अग्रवाल मार्केटमध्ये महिमा नोव्हेल्टी नावाचे एक ज्वेलर्स दुकान असल्याचे सांगितले. अमीत हा स्वस्तात सोने देतो. त्याच्याकडून खरेदी केलेल्या सोन्यावर त्यांना चार टक्के सवलत मिळेल असे सांगितले. सविस्तर चर्चेनंतर त्यांनी अमीतकडून सोने खरेदीची तयारी दर्शविली होती. शंभर ग्रॅम सोन्यासाठी त्यांनी अमीतला सुमारे साडेसात लाख रुपये कॅशने दिले होते. दुसर्या दिवशी त्याने त्यांना शंभर ग्रॅम सोने दिले. यावेळी त्याने त्यांचे सोने चांगल्या भावात विकून देतो असे सांगून त्यांच्याकडून पुन्हा सोने घेतले. सोने विकून येतो असे सांगून अमीत निघून गेला आणि परत आला नाही. त्याला कॉल केल्यानंतर त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही.
दोन दिवसांनी अमीतने त्यांना फोन करुन त्याच्याकडून आणखीन दोनशे ग्रॅम सोने खरेदी करण्यास प्रवृत्त करुन त्यांना तीनशे ग्रॅम सोने देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे त्यांनी त्याला दोनशे ग्रॅम सोन्यासाठी सुमारे पंधरा लाख रुपये दिले. ही रक्कम घेतल्यानंतर तो तीनशे ग्रॅम सोने घेऊन येतो असे सांगून निघून गेला आणि पुन्हा परत आला नाही. अशा प्रकारे सवलतीमध्ये सोने देतो असे सांगून अमीत, हितेश व इतरांनी त्यांच्याकडून तीनशे ग्रॅम सोन्याचे २२ लाख ४७ हजार रुपये घेतले. मात्र सोने किंवा पैसे परत न करता त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी विलेपार्ले पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अमीत जैन, हितेश सोलंकी व इतर आरोपींविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना पळून गेलेल्या अमीत जैनला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याल पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.