बोरिवलीतील नामांकित शाळेत झालेल्या चोरीचा पर्दाफाश

मालाड-नालासोपारा येथून दोघांना मुद्देमालासह अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – सप्टेंबर महिन्यांत बोरिवलीतील सेठ डी. एम. हायस्कूलमध्ये झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात कस्तुरबा मार्ग पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी मालाड आणि नालासोपारा येथून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अण्णादुराई पेरीस्वामी देवेंदर आणि मुर्गेश पेरुमल देवेंदर अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मालाड आणि नालासोपाराचे रहिवाशी आहेत. या दोघांकडून चोरीचा काही मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

राजीव विद्याशंकर मिश्रा हे दहिसरच्या केतकीपाडा परिसरात राहत असून बोरिवलीच्या दौलतनगरच्या सेठ डी. एम हायस्कूलमध्ये २७ वर्षांपासून शिक्षक म्हणून काम होते. गेल्या चार महिन्यांपासून ते तिथे मुख्याधापक म्हणून काम पाहत आहे. २७ सप्टेंबरला ते त्यांच्या घरी होते. यावेळी शाळेचा शिपाई रविकांत गंगाराम परब याने त्यांना कॉल करुन शाळेत चोरी झाल्याचे सांगितले. त्यामुळे ते लागलीच शाळेत आले होते. यावेळी त्यांना शाळेच्या मुख्य कार्यालयातील दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले. कपाटातील सुमारे ऐंशी हजार रुपयांची कॅश, दोन विविध बँकांचे बावीस एफडी प्रमाणपत्र, संगणक हार्डडिस्क असा मुद्देमाल चोरी केल्याचे निदर्शास आले. या प्रकारानंतर त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी राजीव मिश्रा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.

बोरिवलीतील एका नामांकित शाळेत झालेल्या घरफोडीची पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी गंभीर दखल घेत कस्तुरबा मार्ग पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धीरज वायकोस, पोलीस हवालदार मनोज परिट, राजेश पेडणेकर, गणेश पाटील, पोलीस शिपाई महेंद्र महाले, राहुल सांगळे, अमोल फोपसे, अनिकेत सकपाळ, संजय भोये, विकेश शिंगटे, तुषार पुजारी यांनी तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी तीन महिन्यांपासून फरार असलेल्या अण्णादुराई याला मालाडच्या वळणाई वसाहत तर मुर्गेशला नालासोपारा येथील संतोष भवन, पारधीनगर परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत या दोघांनी ही घरफोडी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. आरोपींकडून पोलिसांनी काही मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page