मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याला पाच कोटीच्या खंडणीसाठी धमकी देऊन खंडणीची रक्कम न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देणारा आरोपी त्याच्याच चाहता निघाला. विशेष म्हणजे या आरोपीने सलमानवर मै सिंकदर हू हे गाणे लिहिले होते. सोहेल रसुल पाशा असे या २४ वर्षांच्या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला कर्नाटक येथून मुंबईत पुढील चौकशीसाठी आणण्यात आले होते. प्रसिद्धीसाठी त्याने ही धमकी दिल्याचे बोलले जाते. मात्र प्रसिद्धीच्या मोहापायी त्याला जेलची हवा खावी लागली आहे.
सलमान खान हा बिष्णोई टोळीच्या टार्गेटवर आहे. दहशतीसाठीच या टोळीने सलमानच्या घरासमोर गोळीबारही केला होता. या गोळीबारानंतर सलमानला सतत बिष्णोई टोळीकडून धमक्या येत होत्या. अशीच एक धमकी ७ नोव्हेंबरला सलमानसाठी आली होती. मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांच्या कंट्रोल रुममधील हेल्पलाईन क्रमांकावर एक मॅसेज आला होता. मॅसेज पाठविणार्या व्यक्तीने सलमानकडे पाच कोटीची खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाहीतर त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास वरळी पोलिसांसह गुन्हे शाखेचे गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी करत होते. तपासादरम्यान हा मॅसेज कर्नाटक येथून आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गुन्हे शाखेची एक टिम कर्नाटकला गेली होती. या पथकाने सोहेल पाशा याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच धमकीचा मॅसेज पाठविल्याची कबुली दिली. सोहेल हा सलमानचा प्रचंड चाहता आहे. त्याने त्याच्यासाठी मै सिंकदर हू हे गाणं लिहिले होते. त्याने एका व्यक्तीकडून कॉल करण्यासाठी मोबाईल घेतला होता. या मोबाईलवर त्याने व्हॉटअप ऍप इन्स्टॉल करुन नंतर पाच कोटीच्या खंडणीसाठी तसेच खंडणी न दिल्यास सलमानला जिवे मारण्याची धमकीचा मॅसेज पाठविला होता. त्यानंतर त्याने ते ऍप डिलीट केले होते. त्याच्यावर कोणाचा संशय येऊ नये म्हणून त्याने सलमानवर ज्यांनी कोणीही गाणं लिहिले आहे, त्याच्यासह त्याला मदत करणारा कोणालाही सोडणार नाही अशी धमकी दिली होती. मात्र त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. कर्नाटक येथून अटक केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. प्रसिद्धीसाठी सलमानला धमकी देणे त्याच्या चांगलेच अंगलट आले आहे.
शाहरुखला धमकाविणारा वकिलही गजाआड
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानकडे ५० लाखांच्या खंडणीसाठी थेट वांद्रे पोलीस ठाण्यातील लॅडलाईन धमकीचा कॉल करणार्या फैजान खान नावाच्या एका वकिलाला रायपूर येथून वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्याला ट्रान्झिंट रिमांडवर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात असून बुधवारी दुपारी त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. गेल्या आठवड्यात शाहरुख खानला एका अज्ञात व्यक्तीने ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिली होती. धमकीचा हा कॉल वांद्रे पोलीस ठाण्याच्या लॅडलाईनवर आला होता. अज्ञात व्यक्तीने स्वतचे नाव हिंदुस्तानी असल्याचे सांगून शाहरुखला ५० लाख रुपये तयार ठेव नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर वांद्रे पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन हा कॉल छत्तीसगढच्या रायपूर शहरातून आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर वांद्रे पोलिसांची एक टिम रायपूरला गेली होती. या पथकाने फैजान खान या व्यक्तीला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत फैजान हा वकिल असून त्याच्या मोबाईलवरुन हा कॉल आला होता. त्याने त्याचा मोबाईल चोरीस गेल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्याने २ नोव्हेंबरला पोलिसांत तक्रार केली होती. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. मात्र समन्स बजावून तो हजर झाला नाही. त्यामुळे त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले.