मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – नाईट राऊंडदरम्यान वांद्रे परिसरात गस्त घालणार्या ओशिवरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज विलास गुजर यांना एका मद्यपी आरोपीने हाताने जोरात ठोसा लगावल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरुण राकेश चोप्रा नावाच्या ४१ वर्षांच्या आरोपीविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरुणने मद्यप्राशन केले होते, दारुच्या नशेत त्याने पोलिसांशी हुज्जत घालून, शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
मनोज गुजर हे वांद्रे येथील पोलीस अधिकारी वसाहतीत राहत असून सध्या ते ओशिवरा पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री त्यांचा नाईट राऊंड होता. त्यामुळे ते ओशिवरा ते वांद्रे परिसरातील विविध पोलीस ठाण्यांना भेटी देत होते. रात्री उशिरा ते वांद्रे येथील सिनेअभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटजवील बंदोबस्त पाहण्याासाठी बी. जे रोड परिसरातून जात होते. यावेळी नॅशनल बेकरीजवळील सिग्नलजवळ त्यांना एक व्यक्ती मद्यप्राशन करुन वाहन चालवत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्याला थांबवून त्याची चौकशी केली होती. यावेळी या व्यक्तीने मद्यप्राशन केले होते. चौकशी करणार्या पोलिसांशी त्याने हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर त्याने मनोज गुजर यांच्यावर हात उचलला. हाताच्या ठोशाने त्यांच्या गालावर जोरात ठोसा मारुन दुखापत करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करुन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
याप्रकरणी मनोज गुजर यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध ऑन ड्यूटी पोलिसांशी मद्यप्राशन करुन हुज्जत घालणे, शिवीगाळ करुन मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तपासात आरोपीचे नाव वरुण आकाश चोप्रा असून तो एका खाजगी कंपनीत कामाला आहे. सध्या तो वांद्रे येथील शेर्ली राजन रोड, वगोव्हील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रुम क्रमांक एकमध्ये राहतो. त्याला ३५ (३) अन्वये नोटीस देऊन सोडून देणत आले.