गोळीबारानंतरही शिवकुमारकडून लिलावती हॉस्पिटलची रेकी

बाबा सिद्घीकी वाचणार नाही याची खात्री होताच पलायन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – गोळीबारात गंभीररीत्या जखमी झालेले राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांची वाचण्याची शक्यता कमी आहे अशी माहिती गर्दीतून गोळीबारानंतर पळून गेलेल्या शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा बालकिशन गौतमला समजली होती. या माहितीनंतर शिवकुमार तेथून पळून गेला. गोळीबारानंतर कपडे बदलून शिवकुमार हा लिलावती हॉस्पिटलजवळ गेला होता. तिथे त्याने जवळपास अर्धा तास रेकी करुन माहिती काढण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले होते. मुंबईतून तो पुणे, झांसी, लखनऊला पळून गेला, अखेर एक महिन्यानंतर त्याला बहराईच येथून नेपाळ पळून जाण्याच्या तयारीत असताना उत्तरप्रदेश एसटीएफ आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्तपणे कारवाईत अटक करण्यात आली. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत असून त्याच्या चौकशीतून ही माहिती उघडकीस आली आहे.

ऑक्टोंबर महिन्यांत दसर्‍याच्या दिवशी बाबा सिद्धीकी यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता. गोळीबारानंतर गुरमेल बलजीत सिंग आणि धर्मराज राधे कश्यप या दोन शूटरला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले तर तिसरा शूटर शिवकुमार हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. याच गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी नंतर अठराजणांना पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली होती. मात्र शिवकुमार गौतमसह इतर आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना शिवकुमार गौतमला बहराईच येथून युपी एसटीएफ आणि मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती. शिवकुमार हा नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यासाठी त्याला त्याचे चार सहकारी अनुराग राधेश्याम कश्यप, ज्ञानप्रकाश प्रदीपकुमार त्रिपाठी, आकाश बृजकुमार श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रतापसिंह सुरेशसिंह यांनी मदत केली होती. त्यामुळे शिवकुमार या चौघांनाही अटक करुन मुंबई पोलिसांनी पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते. याच गुन्ह्यांत ते सर्वजण सध्या १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे.

चौकशीदरम्यान शिवकुमार गौतमने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. गोळीबारानंतर पळून गेल्याने तो शर्ट बदलून टी शर्ट घालून पुन्हा घटनास्थळी आला होता. तिथेच त्याला धर्मराज आणि गुरमेल पकडले गेल्याची माहिती समजली होती. जखमी झालेल्या बाबा सिद्धीकी यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये नेल्याचे समजले होते. त्यामुळे तो रिक्षातून लिलावती हॉस्पिटलजवळ गेला होता. तिथे तो अर्धा तास होता. यावेळी हॉस्पिटलबाहेर बाबा सिद्धीकी यांच्या समर्थकांचा मोठा जमाव जमा झाला होता. या गर्दीतून त्याला बाबा सिद्धीकी यांची प्रकृती गंभीर असून त्यांची वाचण्याची शक्यता कमी असल्याचे समजले होते. त्यानंतर तो तेथून पळून गेला होता. रिक्षातून कुर्ला येथे आल्यानंतर तो ट्रेनमधून कुर्ल्याला गेला. कुर्ल्याहून पुण्यात गेल्यानंतर तो झांसी आणि नंतर लखनऊला गेला.

याच दरम्यान तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यासाठी तो बहराईच आला होता. चौकशीदरम्यान त्याने ही माहिती पोलिसांना दिली. बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर गुरमेल, धर्मराज आणि शिवकुमार मुंबईतून पळून जाणार होते. मुंबईतून ते तिघेही उज्जैनला जाणार होते. तिथे त्यांना बिष्णोईचे सहकारी वैष्णवदेवी दर्शनासाठी नेणार होते. मात्र धर्मराज आणि गुरमेल पकडले गेले. त्यामुळे तो एकटाच मुंबईतून पळून गेला. भारतात राहणे त्याच्यासाठी धोकादायक असल्याने त्याला नेपाळला पाठविण्याची सर्व तयारी करण्यात आली होती, मात्र नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page