खाजगी सुरक्षा पुरविण्यासाठी अनधिकृतपणे पिस्तूल बाळगले
तिघांकडून तीन देशी बनावटीचे पिस्तूल, एकवीस राऊंड जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ मार्च २०२४
मुंबई, – वैयक्तिक सुरक्षेसाठी प्राप्त केलेल्या देशी बनावटीच्या पिस्तूलचा कुठलाही परवाना नसताना खाजगी सुरक्षा पुरविण्यासाठी अनधिकृतपणे वापर केल्याचा आरोप असलेल्या तिघांकडून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी तीन देशी बनावटीचे पिस्तूल आणि एकवीस राऊंड जप्त केले आहेत. राजकुमार लालता सिंग, अनिलकुमार विजयनारायण सिंग आणि देवनारायण हरिराम जैस्वाल अशी या तिघांची नावे असून ते तिघेही मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहे. त्यांच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लवकरच या तिघांचे लायसन्स रद्द करण्याची शिफारस उत्तरप्रदेश पोलिसांकडे करण्यात येणार असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे यांनी सांगितले.
दहिसर येथे माजी नगरसेवक अभिषेक विनोद घोसाळकर यांची त्यांचा मित्र मॉरीसभाई ऊर्फ मॉरीस नोरोन्हा याने गोळी झाडून हत्या केली होती. या हत्येची गृहविभागासह मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी गंभीर दखल घेत स्वतजवळ अनधिकृतपणे घातक शस्त्रे बाळगणार्या व्यक्तीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अशा व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. ही कारवाई सुरु असताना कुर्ला येथील नेहरुनगर परिसरात तिघांकडे घातक शस्त्रे असून ते शस्त्रे वैयक्तिक कारणासाठी ते तिघेही वापरत असल्याची माहिती पोलीस शिपाई इंगळे यांना मिळाली होती. ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे यांच्या पथकाने तिथे त्रिवेणी बार परिसरातून अनिलकुमार मिश्रा, राजकुमार सिंग आणि देवनारायण मिश्रा या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन देशी बनावटीचे पिस्तूल आणि २१ राऊंड जप्त केले. त्यांच्याकडे या पिस्तूलचे लायसन्स होते.
वैयक्तिक कारणासाठी त्यांनी पिस्तूल लायसन्स मिळविले होते. मात्र या शस्त्रांचा ते तिघेही पैसे कमविण्यासाठी खाजगी सुरक्षा पुरविण्याच्या कामासाठी वापर करणार होते. उत्तरप्रदेशातून मुंबईत वास्व्यास असताना त्यांना त्यांच्याकडील पिस्तूलची माहिती देणे स्थानिक पोलिसांना बंधनकारक होते. मात्र मुंबईसह ठाण्यात दहा वर्षांपासून वास्तव्यास असताना त्यांनी ती माहिती पोलिसांना दिली नव्हती. त्यामुळे या तिघांविरुद्ध ३० शस्त्र अधिनियम कलमांतर्गत नेहरुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. देशी बनावटीचे पिस्तूल अनधिकृतपणे स्वतजवळ बाळगून त्याची माहिती पोलिसांपासून लपवून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या गुन्ह्यांत तिघांवर अद्याप अटकेची कारवाई करणयात आली नाही. मात्र त्यांच्या शस्त्र परवान्याची माहिती उत्तरप्रदेश पोलिसांना देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडील शस्त्र परवाना लवकरच रद्द केला जाणार आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फसणाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव, प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक निशांत पवार, पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंडे, सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देसाई, पोलीस हवालदार शिंदे, चवहाण, पोलीस शिपाई इंगळे, कोळेकर, घेरडे, पाटील यांनी पार पाडली होती.